Published On : Sat, Aug 19th, 2017

मोनिका किरणापुरे : महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मारेक-यांची जन्मठेप कायम

नागपूर : नंदनवन येथील केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हिची हत्या करणा-या चारही आरोपींची जन्मठेपेसह अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी शुक्रवारी हा बहुप्रतीक्षित निर्णय दिला.

राज्यभर चर्चा झालेल्या या प्रकरणावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नरखेड तालुक्यातील सावरगावचा कुणाल ऊर्फ गोलू अनिल जयस्वाल (३०) हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून अन्य आरोपींमध्ये प्रदीप महादेव सहारे (२९), उमेश ऊर्फ भु-या मोहन मराठे (३०) व श्रीकांत भाऊचरण सोनेकर (३३) यांचा समावेश आहे. ही घटना ११ मार्च २०११ रोजी सकाळी १०च्या सुमारास नंदनवन परिसरात घडली होती.