Published On : Sat, Jun 30th, 2018

सीमेंट रस्त्यांना जोडणारे सर्व चौक तातडीने समतल करा!

नागपूर : दोन रस्त्यांना जोडणारा चौकातील भाग समतल करण्याचे काम तातडीने करण्यात यावे, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले. शनिवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात स्थापत्य व प्रकल्प समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, समिती उपसभापती किशोर वानखेडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, समिती सदस्य भगवान मेंढे, राजुकमार साहू, जितेंद्र घोडेस्वार, सदस्या पल्लवी श्यामकुळे, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, तांत्रिक सल्लागार विजय बनगीनवार, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, गिरीश वासनिक, सी.जी.धकाते, उपअभियंता शकील नियाजी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना सभापती बंगाले म्हणाले, सीमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरीही जंक्शनला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा आढळतो. त्या खड्ड्यामुळे गाडी अडखळते. याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे जंक्शनला जोडणाऱा रस्त्यावरचा भाग तातडीने जोडण्यात यावा, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले. ज्या भागात कामे सुरू आहे, त्या भागातील नगरसेवकांना कामाबद्दल माहिती द्या, अशा सूचनाही सभापती संजय बंगाले यांनी केल्या. जंक्शन तयार करताना एक ‘डेमो जंक्शन’ तयार करून त्याआधारावर शहरातील सर्व जंक्शन तयार करण्याच्या सूचना आपल्या कंत्राटदारांना देण्याचे निर्देश सभापती बंगाले यांनी दिले. सीमेंट रस्ता बांधताना पाण्याचा निचरा होईल, ते रस्त्यावर तुंबणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी शहरात सुरू असलेल्या सीमेंटच्या रस्त्यांच्या तिन्ही टप्प्यांचा आढावा सभापतींनी घेतला. पूर्ण झालेल्या सीमेंट रस्त्याचा थर्ड पार्टी ऑडिट अहवाल समितीपुढे सादर करण्यात यावा, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले. मनपाच्या कंत्राटदारांची मर्यादा तीन वर्षांची वरून दहा वर्षांची करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले. सीताबर्डी मोरभवन मागील डीपी रस्त्याच्या सद्यस्थितीचा आढावा सभापतींनी अधिकाऱ्यांमार्फत घेतला. ४ जुलैपासून अधिवेशन सुरू होत आहे. तो रस्ता जर पूर्ण झाला असेल तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात यावे, अशी सूचना सभापती संजय बंगाले यांनी दिली.