– ‘हर घर तिरंगा’ उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान, नागरिक, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा, यासाठी सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन तो उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज येथे केले.
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. या उपक्रमानिमित्त काटोल रोड स्थित जिल्हा परिषदेच्या माजी शासकीय शाळेत आयोजित कार्यक्रमात श्री. कुंभेजकर बोलत होते. नागपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी राजश्री घोडके, मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता आगरकर, श्रीमती खाडे, श्रीमती मेश्राम यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. विद्यार्थीनींकडून स्वागत गीत, देशभक्तीपर गीतांचे यावेळी सादरीकरण झाले.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहून देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या देदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीसाठी ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हयातील, प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा याकरिता या उपक्रमामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन श्री. कुंभेजकर यांनी यावेळी केले.
शाळकरी मुला-मुलींच्या मनात देशप्रेम, देशभक्तीचे बालसंस्कार व्हावे, या हेतूने शाळा-महाविद्यालयांत त्यांना तिरंग्याचे वितरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना तसेच शेजारी व इतरांना तिरंग्याचे महत्त्व पटवून द्यावे. आपल्या घरांवर तिरंग्याचा अवमान होणार नाही याची दक्षता घेत, तिरंगा व्यवस्थित फडकविला जावा या संदर्भात माहिती द्यावी. येत्या 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सर्वांनी आपापल्या घरांवर तिरंगा झेंडा फडकावून त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. राष्ट्रप्रतिष्ठा अवमान कायद्यानुसार ध्वज संहिता जाहीर करण्यात आली असून त्याचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे. शिक्षकांनीही जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यालये, आस्थापना, नागरिक, संस्था यांना उपक्रमात सहभागी करून घ्यावे. अधिकाधिक लोकसहभाग मिळवून उपक्रम यशस्वी करावा, असेही श्री. कुंभेजकर यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 27 व 28 जुलै रोजी या शाळेत निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री. कुंभेजकर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करुन गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दि. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान प्रभात रॅली, स्वच्छता मोहिम, गावांचा विकास, वृक्षारोपण, मोबाईलचे दुष्परिणाम, ध्वजारोहण, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, लसीकरण मोहिम, विविध स्पर्धांचे आयोजन आदी कार्यक्रम घेण्यात येणार असून हर घर तिरंगा उपक्रम साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका श्रीमती आगरकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती दिघेकर यांनी तर श्रीमती मेश्राम यांनी आभार मानले.
अशी आहे ध्वजसंहिता
ध्वजसंहितेनुसार, आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरीपासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवण 3:2 या प्रमाणात असावी.
तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील, याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो.राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तंभाच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये. राष्ट्रध्वज लावताना, इतर सजावटी वस्तू लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुले किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही, तसेच राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा.
ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर चिन्ह लावू नये. तसेच ध्वज स्तंभाच्या वर अथवा आजूबाजूला काही लावू नये, ध्वज जमिनीपासून उंचावर लावावा. ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अगर पाण्यामध्ये बुडणार नाही अशा पद्धतीने लावावा. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरिता करता येत नाही. तसेच त्याची अवहेलनाही करणे दंडनीय अपराध आहे. त्यामुळे ध्वजाचा उपयोग गाडीवर झाकणे, इमारतीवर झाकणे, टेबलवर टेबल क्लॉथ प्रमाणे टाकणे, ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करणे, ध्वजाचा रुमाल, उशी किंवा शर्ट आदींवर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे चुकीचे आहे.
राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. तसेच तो एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये. ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे, त्या काठीवर वा स्तंभावर ध्वजाच्या टोकावर फुले किंवा हार यासारखी कोणतीही वस्तू, बोधचिन्ह ठेवू नये. राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आहे. आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल अशा प्रकारे कृत्य करू नये.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात घरोघरी ध्वज फडकावा व ध्वज संहिता पाळण्यात यावी, असे आवाहन प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.