Published On : Mon, Sep 14th, 2020

जबाबदारी’ मोहिम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहभागाने प्रभावीपणे राबवूया जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

नागपूर: ‍ कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम नागपूर जिल्ह्यात राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

आपल्या ऑनलाईन संदेशात त्यांनी या मोहिमेमध्ये नागपूर जिल्ह्यातील व महानगरातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावात प्रत्येक घर एक घटक समजून यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे .

या मोहिमेत सर्व नागरिकांचा व लोकप्रतिनिधींचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात टप्प्याटप्प्याने ही तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून यात सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून संशयितांची कोविड-19 चाचणी करण्यात येणार आहे. या तपासणीचे उद्दिष्ट कोविड-19 बाबत प्रत्येक नागरिकांना शिक्षित करणे तसेच संशयित नागरिकांना तात्काळ शोधणे व त्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करणे हे आहे, जेणेकरून जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करता येईल.

कोरोना प्रतिबंधासाठी व्यक्ती व कुटुंब केंद्रबिंदू मानून नागरिकांनी आपापसात अंतर राखावे. तसेच मास्कचा वापर करावा आणि वारंवार हात धुवावा, या त्रिसूत्री चा अवलंब सर्वांनी करणे गरजेचे आहे. शिवाय दुकाने, कार्यालये व आवश्यक कामानिमित्त समाजात वावरताना दक्षता घ्यावी, असेही ठाकरे यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्याबरोबरच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार’ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ चे पालन करुन जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी आरोग्य विभागाला केल्या.