Published On : Mon, Sep 14th, 2020

स्वयंशिस्त पाळा, नियमांचे पालन करा महापौर संदीप जोशी यांचे नागपूरकरांना आवाहन

नागपूर : नागपुरात कोव्हिडची परिस्थिती गंभीर आहे. ४५ हजार नागरिक पॉझिटिव्ह आहेत. कोव्हिड विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आता नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासनाने नियम तयार केले आहेत. त्या नियमांचे पालन करण्यासोबतच नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

महापौर संदीप जोशी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून नागरिकांना भावनिक साद घातली आहे. ते म्हणतात, कोरोनाचे ४५ हजार रुग्ण असले तरी जवळपास ३४ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नागपूर महानगरपालिका आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही परिस्थिती हाताळण्यासाठी कसून प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही यंत्रणाही कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. नागपूर महानगरपालिकेतच १५० च्या वर अधिकारी/कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. रुग्णांची सेवा करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यासोबतच पोलिस यंत्रणेतील शेकडो कोरोना योद्धे कोरोनाबाधीत आहेत. मेडिकलमध्ये २५०० तर मेयोमध्ये शंभरावर कोरोनायोद्धा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती हाताळणे म्हणजे यंत्रणेला कसरत करावी लागत आहे.

असे असतानाही नागपूर महानगरपालिकेने रुग्णवाहिकांची संख्या २० वरून ६५ करण्यात आली आहे. शववाहिका नऊ वरून २४ केल्या आहेत. खासगी कोव्हिड हॉस्पीटलची संख्या १५ वरून ४५ केली. खासगी रुग्णालयात अजूनही नॉन कोव्हिड रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे तेथील बेड्‌सची संख्या वाढविण्यात अडचणी येत आहेत. ही सर्व परिस्थिती नागरिकांना अवगत होणे गरजेचे असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

अनेकजण अंगावर ताप काढतात. कुठल्यातरी गोळ्या घेऊन घरीच उपचाराविना राहतात. जेव्हा ऑक्सीजन लेवल कमी होते तेव्हा धावाधाव करतो. परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो. दुसरीकडे काही लोकं मात्र काहीही झालेले नसताना मला काहीतरी होईल, या भीतीने रुग्णालयात दाखल होतात आणि बेड राखून ठेवतात. या दोन प्रकाराविरुद्ध तिसऱ्या प्रकारातील लोक ‘मला काहीच होत नाही’ या अविर्भावात शहरात विनाकारण फिरत असतात. आणि घरी जाऊन सोशल मीडियावर लॉकडाऊन लावले पाहिजे, असे जाहीर मत मांडतात.

लॉकडाऊन हा वेगळा विषय आहे. त्याचा किती फायदा होईल, हा नंतरचा विषय आहे. मात्र, आपण स्वत: जर नियम पाळले आणि स्वयंशिस्त लावली तर कोरोना आटोक्यात यायला वेळ लागणार नाही. परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर ही शिस्तच महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनो, स्वत: शिस्त पाळा. विनाकारण फिरणे टाळा. कोरोनाविरुद्ध संघटित लढा देऊन कोरोनाला पळवा, असे मार्मिक आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.टे