अनधिकृत वस्त्यांमधील घरे नियमित करू : पालकमंत्री

Advertisement

नागपूर: शहराला लागून असलेल्या पण एनएमआरडीएच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या नागरिकांच्या अनधिकृत घरांचे नियमितीकरण एनएमआरडीएमार्फत करून देण्यात येईल. नागरिकांनी याबद्दल कोणतीही काळजी करू नये. एकही घर अनधिकृत राहणार नाही याची काळजी शासन घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गोन्हीसिम येथे बोलताना केले.

पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते आज बहादुरा, खरबी व गोन्हीसिम या तीनही ठिकाणी सुमारे 16 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या तीनही कार्यक्रमात माजी जि.प. सदस्य शुभांगी गायधने, अजय बोढारे, सरपंच भोला कुरटकर, उपसरपंच दिलीप चाफेकर, रमेश चिकटे, नरेंद्र नांदूरकर, राजकुमार वंजारी, इजाज घाणीवाला, सुभाष गुजरकर, विजय नाखले, बाळू घोडमारे, श्रीमती पांडे, श्रीमती ढोमणे, यशवंत खंडाईत, दिवाकर सेलोकर, राजू अन्सारी व अनेक ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

बहादुरा येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम, रस्त्याचे खडीकरण, रस्त्याचे डांबरीकरण, अशा 31 रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण 38 कामांसाठी 4 कोटी 20 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे.

खरबी येथे 53 कामांचे भूमिपूजन करण्यात आले. येथेही सिमेंट रस्त्यांचे बांधकाम आणि गावातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच कौशल्य विकास इमारत बांधकामावर 2 कोटी 82 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे. एकूण सर्व कामांसाठी 6 कोटी 66 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

गोन्हीसिम येथे 23 कामांसाठी 2 कोटी 37 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून सिमेंट रस्ते, अंतर्गत गावातील रस्त्यांची कामे होणार आहेत. या तीनही भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला गावकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.