Published On : Wed, Sep 18th, 2019

पोलिसांना विविध सुविधांसाठी आतापर्यंत 900 कोटी : पालकमंत्री

नागपूर: पोलिसांना देण्यात येणार्‍या सुविधा, निवासस्थानांचे बांधकाम, पोलिस ठाण्यांच्या इमारतीची दुरुस्ती व अन्य कारणांसाठी आतापर्यंत शासनाने 900 कोटी रुपये नागपूर पोलिसांना दिले असून आजपर्यंत पोलिस विभागाला एवढा निधी कधीच मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा निधी प्राप्त होऊ शकला, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

शहरातील उत्तर नागपुरात कपिलनगर, पूर्व नागपुरात पारडी व वाठोडा या तीन पोलिस ठाण्यांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आ. डॉ. मिलिंद माने, आ. कृष्णा खोपडे, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम, पोलिस उत्पायुक्त नीलोत्पल, सहायक पोलिस आयुक्त परशुराम कार्यकर्ते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मत्ते, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, पांडुरंग मेहर, पोलिस आयुक्त महावरकर, बाल्या बोरकर, नगरसेविका चेतना टांक, पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- जरीपटका पोलिस ठाण्यावर येणारा भार कमी करण्यासाठी कपिलनगर व कळमना पोलिस ठाण्यावरील भार कमी करण्यासाठी पारडी आणि वाठोडा अशा पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. गेल्या पाच वर्षाच्या भाजपाच्या काळात गुन्ह्यांची संख्या कमी झाली. झोन 5 मध्ये पोलिसांची चांगली टीम लाभली आहे. लोकप्रतिनिधी आणि पोलिस ही दोन्ही चाके नागपुरात चांगली लाभली आहे, असेही ते म्हणाले.


पोलिस आयुक्त कार्यालयाची आधुनिक इमारत होणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण शहरावर एकाच ठिकाणाहून नियंत्रण ठेवता येणार आहे. नागरिकांचे आणि नागरिकांचे मालमत्तांचे रक्षण करणे शासनाचे कर्तव्य आहे. यासाठी पोलिस दल अधिक मजबूत आणि आवश्यक त्या सुविधांसह परिपूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या तीनही पोलिस ठाण्यांना आवश्यक तेवढे पोलिस कर्मचारी देण्यात आले आहेत.

आ. कृष्णा खोपडे आणि आ. डॉ. मिलिंद माने यांचेही यावेळी भाषण झाले. या दोन्ही आमदारांची आज उद्घाटन झालेल्या नवीन पोलिस ठाण्यांची मागणी होती.