Published On : Mon, Oct 15th, 2018

सर्वांच्या जीवनात सुख आणि समृद्धी नांदू दे – देवेंद्र फडणवीस

नागपूर : नवरात्रीचे पावन पर्व परंपरागत पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरे करत असतानाच या उत्सवानिमित्त श्री दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख व समृद्धी नांदो तसेच समाजासाठी व राष्ट्रासाठी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळो, असा आशीर्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नवरात्रा निमित्त शहरातील विविध श्री नवरात्र महोत्सव मंडळाला भेट देऊन मातेची पूजा केल्यानंतर मागितला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळाने बसविलेल्या विविध मंडळांना भेट दिली. तसेच श्री मातेची आरती केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुलशीबाग रोड महाल येथील माळवी सुवर्णकार संस्था श्री परांबा महालक्ष्मी मंदिरास भेट देऊन मातेची विधीवत आरती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर नवरात्र प्रांगण स्व. अमृत आचार्य मार्ग पेटा कॉलनी येथील श्री नवरात्र महोत्सव मंडळाला भेट देऊन श्री देवी मातेचे आशीर्वाद घेतले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या गरबा उपक्रमाबद्दलही माहिती घेतली. त्यानंतर श्री कच्छ पाटीदार समाज, पाटीदार कॉलनी लकडगंज येथे भेट देऊन श्री मातेचे पूजन केले.

पारडीच्या उत्सवात सहभाग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अति प्राचीन असलेल्या पारडी येथील श्री भवानी मातेच्या मंदिरास भेट दिली. तसेच श्री भवानी माता सेवा समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आश्विन नवरात्र महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी श्री भवानी मातेची विधीवत पूजा करुन मातेचा आशीर्वाद घेतला तसेच सर्व जनतेच्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्याची मातेला प्रार्थना केला. हुडकेश्वर येथील रेणुकानगर येथे श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश तितरमारे यांनी स्वागत केले.