नागपूर – ‘एक तरी अंगी असू दे कला…नाही तर काय फुका जन्मला’… ‘येऊ दे दया आता तरी गुरुमाउली…या आयुष्याची दोरी कमी जाहली’… राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अश्या अनेक भजनांनी वातावरण भक्तीमय झाले होते. निमित्त होते विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांवर आधारित या स्पर्धेला आज, बुधवार, दि. १६ जुलैला शुभारंभ झाला.
सक्करदरा (सोमवारी क्वार्टर) येथील संताजी सभागृहात गुरुकुंज मोझरी येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी श्री. लक्ष्मणराव गमे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारी अध्यक्षस्थानी होते. तर पूर्ती बाजारच्या संचालक सौ. केतकी कासखेडीकर, अच्युत महाराज सेवा संस्थानचे सचिन देव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अशोक यावले, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे, संताजी सभागृहाचे नानाभाऊ ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक व अशोक यावले, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव जयप्रकाश गुप्ता, उपाध्यक्ष गौरीशंकर पाराशर व माजी आमदार अशोक मानकर, कोषाध्यक्ष राजेश बागडी, बाळासाहेब कुळकर्णी, दीपक खिरवडकर, अविनाश घुशे, विजय फडणवीस, राजेश कुंभलकर, मनिषा काशीकर, किशोर पाटील, भोलानाथ सहारे, श्रीरंग वराडपांडे, दिलीप जाधव, शशांक खेकरे यांची उपस्थिती होती.
स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाज प्रबोधन आणि राष्ट्रभक्तीपर भजनांचा जागर अनुभवायला मिळाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पारंपरिक चालींवर आधारित प्रबोधनात्मक व राष्ट्रभक्तीवर आधारित विषयांवरची भजनं यावेळी मंडळांनी सादर केली.
पहाटे पाचपासून उत्साह
स्पर्धेसाठी बुधवारी पहाटे पाचपासूनच विदर्भातील भजन मंडळे सभागृहात दाखल झाली होती. पहिल्या दिवशी १५० हून अधिक मंडळांनी भजने सादर केली. भजनांचे बोल, पहाडी स्वर, भक्ती अन् देशभक्तीचा मिलाफ असे एकूणच उत्साहाचे वातावरण स्पर्धेमुळे तयार झाले होते. प्रत्येक मंडळातील महिला-पुरुषांनी स्पर्धेसाठी विशेष तयारी केली होती.
महाअंतिम फेरी शुक्रवारी
या स्पर्धेची महाअंतिम फेरी शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर प.पू. जितेंद्रनाथ महाराज, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री. जनार्दनपंत बोथे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती असेल.