नागपूर : बिनाकी ले-आउटमधील ‘गौरव स्टेशनरी’ या दुकानात भरदिवसा फसवणूक करून चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचवटी नगर येथील रहिवासी आणि दुकानाचे मालक श्री. प्रशांत पुरुषोत्तम हनवते यांनी याप्रकरणी यशोधरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दि. 14 जुलै 2025 रोजी दुपारी 2.25 वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात तरुण दुकानात आला. त्याने सहा मोठे रजिस्टर (प्रत्येकी 60 रुपये) आणि एक पेन बॉक्स (किंमत 80 रुपये) असा एकूण 440 रुपयांचा माल घेतला. पैसे ऑनलाईन पाठवले असल्याचा बनाव करत त्याने दुकानमालकाच्या वडिलांची फसवणूक केली आणि काही क्षणांतच दुकानातून पळ काढला.
या घटनेची संपूर्ण दृश्ये दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, त्या तरुणाचे छायाचित्रही पोलिसांना पुरावा म्हणून देण्यात आले आहे. तक्रारीत हनवते यांनी नमूद केले आहे की, अशीच घटना यापूर्वीही परिसरात घडली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रशांत हनवते यांनी संबंधित तरुणावर भारतीय न्यूय संहिता (BNS) अंतर्गत कलम 303 नुसार फसवणूक करून चोरी केल्याचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध घेऊन नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी विनंतीही केली आहे.