नागपूर: नागपूर महानगरपालिकेची आपली बससेवा ही अधिकाधिक नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे. प्रवासीसंख्या, डिजिटल पेमेंटचा वापर या मापदंडावर आपली बस नागरिकांच्या पसंतीस पडत आहे. विशेष म्हणजे, मंगळवार १५ जुलै रोजी एकाच दिवशी आपली बसेने तब्बल १ लाख ५४ हजार ७२८ प्रवाशांनी प्रवास करीत विक्रम केला आहे.
मनपाच्या आपली बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मंगळवार १५ जुलै हा एक मैलाचा दगड ठरला आहे. ‘आपली बस’ ने १५ जुलै रोजी तब्बल १ लाख ५४ हजार ७२८ प्रवाशांची विक्रमी वाहतूक करून आपला आजवरचा सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा विक्रम नोंदवला आहे. हा टप्पा शहरात सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, नागपूरच्या नागरिकांचा ‘आपली बस’ सेवेवरील वाढता विश्वास यातून दिसून येतो आहे. मनपाच्या परिवहन विभागाने केलेल्या या विक्रमी कामगिरी बद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी अभिनंदन व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
मनपा मुख्यालयातील दालनात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता.१६) मनपाच्या परिवहन विभागाद्वारे आपली बस मध्ये बसविण्यात आलेल्या प्रवासी गणना प्रणालीची पाहणी केली. सध्या ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर १२ मीटर लांबीच्या ३० बसेसमध्ये कार्यान्वित आहे. यावेळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, मनपाचे परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, ‘चलो’ चे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आपली बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुलभ व आरामदायी प्रवासाची व्यवस्था करून देण्यासोबतच प्रवासी गणना प्रणाली सर्व बसेस मध्ये कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या.
एका दिवस २६ लाखांचा महसूल
मंगळवार १४ जुलै रोजी मनपाच्या आपली बसेसना एकूण २८.८८ लाख रुपये इतका महसूल मिळाला. यामध्ये डिजिटल आणि रोख स्वरूपातील दोन्ही प्रकारचा संग्रह समाविष्ट आहे. त्यातील डिजिटल पेमेंटचे प्रमाण अधिक वाढताना दिसत आहे. ‘डिजिटल नागपूर’ च्या दिशेने सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
प्रवासीसंख्या – १.५४ लाखापर्यंत झेप
गेल्या आठवड्याभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास ८ जुलैपासून प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. मंगळवारी १४ जुलै रोजी सर्वाधिक १,५४,७२८ प्रवासीसंख्या नोंदवण्यात आली आहे.
पास मोहीमेला उत्तम प्रतिसाद
अधिकाधिक विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, ‘आपली बस’ने नुकतीच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पास मोहीम सुरू केली आहे, ज्यात जे.डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गायकवाड पाटील कॉलेज, एन.एम.सी. शाळा, जयताळा, सेंट ॲन स्कूल, खापरखेडा आणि इतर अनेक शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या विद्यार्थी अनुकूल मोहिमेमुळे आपली बस अधिक परवडणारी आणि सुलभ बनवण्याचे उद्दिष्ट आहे, त्याचबरोबर शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल प्रवासाच्या पद्धतींना प्रोत्साहन दिले जात आहे. या मोहिमेतून आत्तापर्यंत १००० हून अधिक पासेसची विक्री झाली आहे. यात मासिक पासेसवर ६६ टक्के तर, त्रैमासिक पासेसवर ७२ टक्के सूट दिली आहे.