Published On : Thu, Dec 6th, 2018

विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून दिले वाहतूक नियमांचे धडे

Advertisement

.

.

नागपूर : दरवर्षी रस्ते अपघातात हजारोंचे बळी जात असतात. वाहनचालकांनी वाहतुकींचे नियम योग्य पद्धतीने पाळल्यास हे अपघात निम्म्याने कमी होऊ शकतील. खरेतर वाहतुकीचे नियम पाळणे ही जीवनशैली झाली पाहिजे. हा संदेश घेऊन शेकडो शाळकरी विद्यार्थी बुधवारी रंगांच्या दुनियेत रंगले होते. हा उपक्रम नागपूर शहर पोलिसांच्यावतीने राबविण्यात आला.

शहर पोलीस व वाहतूक शाखेच्या रस्ते सुरक्षा दलातर्फे सेंट पॉल शाळेच्या परिसरात रस्ता सुरक्षा विषयावर आंतरशालेय चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपायुक्त (वाहतूक शाखा) तिळक रोशन, सेंट पॉल शाळेचे संचालक डॉ. राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्या देवांगणा पुंडे, मुख्याध्यापिका संगीता पिरके, हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान माने, वाहतूक शाखेचे पीआय वाजीद शेख, कॉन्स्टेबल देठे, गोविंद चाटे, नीलेश बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. उपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम पाळण्याबाबत प्रेरक मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत शहरातील विविध शाळांचे ८०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आरएसपी परेड व सलामी दिली. त्यानंतर चित्रकलेला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियम पाळण्याचा आग्रह धरणारे व नियम न पाळल्यामुळे कसे धोके उद्भवतात यावर अतिशय मनमोहक चित्र काढून सर्वांचे लक्ष वेधले.

सोबत आकर्षक घोषवाक्यही मुलांनी तयार केले. सध्या शहरातील अनेक चौकामध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत आवाहन करणारे ‘गब्बर सिंग’चे पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधत आहेत. विद्यार्थ्यांनी काढलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रांनाही चौकात असेच स्थान देण्यात येणार असल्याचे पोलीस विभागातर्फे सांगण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरएसपी हेड कॉन्स्टेबल अतुल आगरकर व संचालन शाळेच्या शिक्षिका संगीता मानकर यांनी केले. डॉ. राजाभाऊ टांकसाळे यांनी आभार मानले.