Published On : Sat, Sep 2nd, 2017

५ ते २० सप्टेंबर दरम्यान मनपाची कुष्ठरोग शोध मोहीम

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या कुष्ठरोग शोध मोहीम समन्वय समितीची आढावा बैठक शुक्रवार (ता.१) रोजी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतील सभागृहात पार पडली.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नोडल अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य सेवा कुष्ठरोग नागपूर विभागाच्या सहायक संचालक डॉ.माध्यमा चहांदे, नागपूर कुष्ठरोग पथकाच्या पर्यवेक्षक डॉ. संजय मानेकर, डॉ.मडके, डॉ. अनुपमा रेवाळे, डॉ.ख्वाजा, डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

पंतप्रधान प्रगती योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे दिनांक ५ ते २० सप्टेंबर या कालावधीत आशा व स्वयंसेवकांची चमू मनपा व नागपूर कार्यक्षेत्रातील स्लम भागात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन तपासणी करून सर्वेक्षण करणार आहे. या मोहिमेचे संनियंत्रण व पर्यवेक्षण आरोग्य विभाग मनपा व पर्यवेक्षीय नागरी कुष्ठरोग पथक करणार असल्याची माहिती सहायक संचलाक माध्यमा चहांदे यांनी दिली. या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन व अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यात येण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.

नागपूर शहरातील स्लमची लोकसंख्या ७ लाख ५८ हजार इतकी असून आशा व स्वयंसेवक यांची चमु रोज २५ घरी जाऊन प्रत्येक नागरिकांची तपासणी करणार आहे. तपासणीमध्ये जर कोणी रूग्ण आढळला तर त्याच्यावर त्वरित उपाययोजना मनपा व शासनाद्वारे करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यासंदर्भाती डॉक्टर्सना, आशा व स्वयंसेवकांना दिले जाणारे प्रशिक्षण वर्ग पूर्ण झाले आहेत. कुठलीही मदत लागली तर मनपा प्रशासन सज्ज आहे. मोहिमेत कोणतीही अडचण येणार नाही याची विशेष काळजी घ्यावी व मोहीम कशी यशस्वी होईल, याकडे लक्ष देण्यात यावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिले.