Published On : Sat, Sep 2nd, 2017

फेटरीतील विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न

नागपूर : फेटरीच्या सर्वांगिण विकासासाठी गावकऱ्यांनी मनापासून साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श दत्तक ग्राम फेटरी गावात आज अमृता फडणवीस यांच्या हस्ते सुमारे तीन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण संपन्न झाले, यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार समीर मेघे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे, पंचायत समिती सभापती नम्रता राऊत, सरपंच ज्योती राऊत, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी अधिकारी आशा पठाण, रवि अग्रवाल उपस्थित होते.

अमृता फडणवीस गावकऱ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, फेटरीसाठी अजून खूप काही करायचे असून यासाठी गावकऱ्यांनी प्रोत्साहन द्यावे व उर्वरित राहिलेले कामे कसे होतील यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा, आपण तर प्रयत्नशील आहोतच, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्या म्हणाल्या की, फेटरीच्या गावकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून या सुविधांचा गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे म्हणाले की, खासदार निधीतून 57 लाख रुपये खर्चुन तयार होणाऱ्या सांस्कृतिक भवनाचा फेटरी गावातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असून या सांस्कृतिक भवनामुळे लोकांना कमी किंमतीत कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध होईल व या सभागृहामुळे समाज एकत्र येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार समीर मेघे म्हणाले की, फेटरी गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासचे कामे सुरु असून फेटरी राज्यात आदर्श गाव म्हणून नावरुपास येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी अमृता फडणवीस व उपस्थितांच्या हस्ते वॉटर एटीएम, सांस्कृतिक भवनचे भूमिपुजन, व्यायाम शाळेचे लोकार्पण, फेटरी येथे एनआयटीमार्फत बगीचा लोकार्पण व जिमचे उद्घाटन असे अनेक कार्यक्रमाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रामसेविका विणा गायकवाड व आभार मुकेश ढोमणे यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.