नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
नागपूर : शहरातील दाभा परिसरात बिबट्याचा वावर सतत वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील संपत हाउसिंग सोसायटीत बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याचा शिकार केल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला करतानाचा क्षण कैद झाला आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, हा प्रकार नवा नाही. मागील पंधरा दिवसांपासून बिबट्या या परिसरात सातत्याने दिसतो आहे आणि दर दोन-तीन दिवसांनी तो कुत्र्यांना शिकार बनवत आहे.
या बिबट्याला काही दिवसांपूर्वी दोन बछड्यांसह फिरताना देखील पाहण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील नागरिक अधिकच चिंतेत आहेत.
नागरिकांनी वन विभागाला यासंदर्भात वारंवार कळवले असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. वेळेवर उपाययोजना न झाल्यास बिबट्या माणसांवरही हल्ला करू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप आणि भीती दोन्ही वाढले असून, संध्याकाळनंतर कोणीही घराबाहेर पडण्यास धजावत नाही. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे आणि नागरिकांचा जीव धोक्यात न येता सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.