नागपूर – ‘स्मार्ट सिटी’ या गोंडस नावाखाली नागपुरात २०१९ मध्ये उभारण्यात आलेले डिजिटल किऑस्क्स आज केवळ निष्क्रियच नाही, तर भंगारसदृश अवस्थेत आहेत. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSDCL) मार्फत लावलेले हे ६५ किऑस्क्स नागरिकांसाठी सेवाभावी ठरणार होते, पण आज त्यांचा उपयोग काहीच उरलेला नाही.
या किऑस्क्सद्वारे वीज-पाण्याचे बिल भरणे, बस-रेल्वे तिकिटे काढणे, वाहतुकीची माहिती मिळवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत पॅनिक बटण वापरणे यांसारख्या सोयी दिल्या जाणार होत्या. मात्र, सहा वर्षांनंतर या यंत्रांपैकी एकही कार्यरत नाही. बहुतांश मशीन vandalise (सदोषपणे नष्ट) झाली असून, काही ठिकाणी त्यांचा उपयोग तरुणांचे ‘हॅंगआउट पॉइंट’ म्हणून होतो आहे.
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी सॉफ्टवेअरवरच २ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्याव्यतिरिक्त हार्डवेअर, बसविण्याचा खर्च आणि देखभाल यावर आणखी कोट्यवधींचा खर्च झाला. तरीही यामागे काहीच ठोस यश दिसून आले नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा हे किऑस्क्स प्रत्यक्षात उभे राहिले, तेव्हाच स्मार्टफोनमुळे नागरिकांना अनेक सुविधा मोबाईलवर मिळू लागल्या होत्या. त्यामुळे या किऑस्क्सचे मॉडेल सुरुवातीपासूनच कालबाह्य होते, असा आरोप तज्ज्ञांनी केला आहे. काहींच्या मते, योग्य नियोजन केले असते, तर हे किऑस्क्स माहिती केंद्र किंवा तिकिट काउंटरसारखे वापरता आले असते.
आज मात्र ही यंत्रे शहरभरात निष्क्रिय अवस्थेत उभी आहेत. एक प्रकारचे स्मारक, जे फक्त अपयश आणि करदात्यांच्या पैशाच्या वायफळ खर्चाची साक्ष देतात.
‘स्मार्ट’ योजनांची झगमग, पण नियोजनाचा अभाव-
या सगळ्या प्रकारावरून एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष उपयोग होईल, अशा योजनांवर पैसा खर्च करण्याऐवजी प्रशासन असल्या ‘फॅन्सी’ प्रकल्पांवरच का भर देते?
नागरिकांच्या पैशातून निर्माण झालेला हा ‘स्मार्ट सिटी’चा प्रयोग आज अपयशाचे प्रतीक बनला आहे. या चुका पुन्हा होऊ नयेत, हीच करदात्यांची एकमेव अपेक्षा राहिली आहे.
..वंशिका मालवीय आणि रिशा मीरपुरी