नागपूर: महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पावनी बफर रेंजमधील दाहोदा-भट्टीटोला गावाजवळील विहिरीत २५ जानेवारी रोजी सुमारे एक वर्षाचा नर बिबट्या मृत आढल्याने खळबळ उडाली. तुयापर बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक २४६ जवळील पुरुषोत्तम वासनिक यांच्या शेतजमिनीवर असलेल्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला.
वन अधिकारी आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) ने मृतदेह बाहेर काढला. स्निफर डॉगच्या मदतीने आजूबाजूच्या परिसरात कसून शोध घेतला असता कोणताही संशयास्पद घटक आढळला नाही.
दुसऱ्या दिवशी, २६ जानेवारी रोजी, नागपूरचे विभागीय वन अधिकारी (दक्षता) पी.जी. कोडपे यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर शवविच्छेदन करण्यात आले. ही तपासणी डॉ. सुजित कोलंगट (डब्ल्यूआरटीसी गोरेवाडा), डॉ. एस.एस. मेश्राम (पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी, देवलापर) आणि डॉ. मयंक बर्डे (पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी, पेंच व्याघ्र प्रकल्प) यांनी केली. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अधिकाऱ्यांनीही या प्रक्रियेचे पर्यवेक्षण केले.
शवविच्छेदनात बिबट्याचे सर्व शरीराचे अवयव शाबूत असल्याचे पुष्टी झाली. फॉरेन्सिक विश्लेषणासाठी जैविक नमुने गोळा करण्यात आले.तर प्राथमिक निष्कर्षांमध्ये बिबट्याचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले.