Published On : Sat, Jun 26th, 2021

शहरातील एल.ई.डी. पथदिव्यांनी केली मनपाची मोठी आर्थिक बचत

Advertisement

महापौरांनी केले कौतुक : १५१२५ पथदिवे वाढले तरीही उर्जेची बचत

नागपूर : नागपूर शहरात असलेले मर्क्युरी सोडियमचे पारंपरिक पथदिवे बदलून ऊर्जा कार्यक्षम एलईडी पथदिव्यांमध्ये परिवर्तित करण्याचे काम ३ जानेवारी २०१७ पासून सुरू झाले. त्यावेळेस शहरात पारंपारिक पथदिव्यांची संख्या १२९०४० एवढी होती व विद्युत देयकाचा वार्षीक खर्च ३५.६१ कोटी रुपये होते. आज शहरात एल.ई.डी.पथदिवे १४४१६५ असून विद्युत देयक फक्त १९.६२ कोटी रुपये आहे. या बदलामुळे पथदिव्यांच्या वीज बिलात आजच्या घडीला सुमारे १६ कोटींची बचत झाली असून आजच्या विद्युत दरानुसार ही बचत ३२ कोटीच्या घरात आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचती सोबतच मनपाची आर्थिक बचतही झाली आहे.

या प्रकल्पाचा आढावा घेण्यासंदर्भात नुकतीच महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती दीपक चौधरी, स्थापत्य विशेष समिती राजेंद्र सोनकुसरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी स्थायी समिती सभापती विजय झलके, माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, कार्यकारी अभियंता अजय मानकर आदी उपस्थित होते.

या बैठकीत उर्जा बचतीचा आणि पथदिव्यांच्या बिलापोटी अदा करण्यात आलेल्या रक्कमेचा आढावा महापौरांनी घेतला. सन २०१६-१७ मध्ये जुने मर्क्यूरी, सोडियम पथदिवे बदलून नवीन एलईडी पथदिवे लावण्याच्या कार्याला टप्प्याटप्प्याने सुरूवात झाली. जुन्या पथदिव्यांच्या बिलापोटी सन २०१६-१७ मध्ये १२९०४० पथ दिव्यांसाठी ३५.६१ कोटी दयावे लागत होते. सन २०१८-१९ मध्ये १३९४०५ पथदिव्यांसाठी मनपाला ३३.७९ कोटी रुपये अदा करावे लागले होते. २०१९-२० दरम्यान १४२८८० एलईडी पथदिवे लागल्यानंतर मनपाला बिलापोटी भरावी लागलेली रक्कम १८.७२ कोटी रुपये इतकी होती. तर २०२०-२१ मध्ये मनपाला १४४१६५ पथदिव्यांसाठी केवळ १९.६२ कोटी रुपये बिलापोटी अदा करावे लागले. तब्बल १६ कोटींच्या घरात हा बचतीचा आकडा आहे. सन २०२१-२२ या वर्षात मे महिन्यापर्यंत केवळ ५.०९ कोटी रुपये अदा करावे लागले आहे. विशेष म्हणजे, २०१८-१९ पूर्वी जे जुने पथदिवे होते त्याच्या तुलनेत एलईडी पथदिव्यांची संख्या ही अधिक प्रमाणात आहे. जुन्या पथदिव्यांची संख्या १२९०४० वर्ष २०१६-१७ मध्ये इतकी होती तर वर्ष २०२०-२१ मध्ये आतापर्यंत लावण्यात आलेल्या एलईडी पथदिव्यांची संख्या १४४१६५ इतकी म्हणजे १५१२५ ने अधिक आहे.

नवे एलईडी पथदिव्यांमध्ये टायमर सेट करण्यात आले असून पथदिवे सुरू झाल्यानंतर चार तास पूर्ण प्रकाश देण्यात येतो. रस्त्यावरची वाहतूक कमी झाल्यानंतर दोन-दोन तासांनी हा प्रकाश कमी केला जातो. अर्थात ६० टक्क्यांवर आणला जातो. नंतर ५.३० तास प्रकाश ५० टक्के असतो.

अगोदर विद्युत भार १७.३६ मे.वॅट होता, आता एलईडी पथदिवे लावल्याने कमी होऊन ७.३० मे.वॅट इतका विद्युतभार राहला आहे. विद्युत भाराबाबतची ही टक्केवारी ४२.०५ इतकी आहे. आता असलेल्या पथदिव्यांच्या संख्येनुसार जुन्या पथदिव्यांचे आजच्या दरानुसार वीज बिल सुमारे ५२ कोटींच्या घरात असते. अर्थात जर एलईडी पथदिव्यांचा प्रकल्प झाला नसता तर मनपाला ५२ कोटी रुपये विजबिलापोटी अदा करावे लागले असते. मात्र एलईडी पथदिव्यांमुळे हा आकडा आज केवळ १९ कोटींच्या घरात आहे. याचाच अर्थ नागपूरकरांना पथदिव्यांचा प्रकाश अधिक प्रमाणात मिळाला. उर्जाही अधिक मिळाली. पथदिवे बंद असण्याचे प्रमाणही घटले. नागरिकांच्या तक्रारीही कमी झाल्या आणि या सर्व प्रकल्पामुळे वीज बिलात मनपाची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत झाली. या प्रकल्पामुळे मनपाला झालेल्या फायद्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी बैठकीत अधिका-यांचे आणि प्रकाश विभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. काही ठिकाणी जर एलईडी पथदिवे बदलणे राहिले असल्यास ते तातडीने बदलावे, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.