नागपूर: झोपडपट्टीधारकांचे ले-आऊट नियमित करून त्यांना स्थायी स्वरूपाचे पट्टे वाटपासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून शनिवारी (ता. ३१) महापौर नंदा जिचकार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात प्रभाग ३७ अंतर्गत येणाऱ्या कामगार कॉलनी आणि तुकडोजी नगर परिसरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप केले.
यावेळी मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, प्रभाग ३७ चे नगरसेवक प्रा. दिलीप दिवे, प्रमोद तभाने, नगरसेविका सोनाली कडू, कार्यकर्ते केशव ठाकरे, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लिना बुधे उपस्थित होते. यावेळी एकूण ४५ पट्टे तयार होते. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात पाच नागरिकांना पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. ज्यांना पट्टे वाटप करण्यात आले त्यांच्यामध्ये अरुण विश्वनाथ रामटेके, राजेंद्र हरिभाऊ गजभिये, गुलाब रामाजी जामधे, कांता माणिकराव रोहणे, दशरथ हरिभाऊ गजभिये यांचा समावेश आहे.