नागपूर: झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागाने मिशन मोडवर या कामाला सर्वोच्च प्राधान्य देतांनाच येत्या 15 ऑगस्टपर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील अडीच हजार झोपडपपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.
हैद्राबाद हाऊस सभागृहात दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, महानगरपालिका आयुक्त विरेंद्र सिंह, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, प्रा. राजीव हडप, विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण, अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र कुंभारे, उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाय, नागपूर सुधार प्रन्यासचे महाव्यवस्थापक अजय रामटेके, झोपडपट्टी विकास प्रकल्प अधिकारी डी.डी. जांभुळकर, प्रकल्प सल्लागार श्रीमती लिना बुधे, तसेच सर्व नगरसेवक, विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
नागपूर शहरात 424 झोपडपट्या असून त्यापैकी 293 घोषित झोपडपट्या आहेत. यापैकी 15 महानगरपालिकेच्या, 52 नागपूर सुधार प्रन्यासच्या तर 226 राज्य शासनाच्या व खाजगी तसेच इतर विभागाच्या जागेवर वसलेले आहे. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात 67 झोपडपट्या असून यापैकी 43 झोपडपट्या शासनातर्फे घोषित झाल्या आहेत. शासनातर्फे घोषित झालेल्या झोपडपट्यांमधील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करण्याची सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, झोपडपट्टीधारकांकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन 15 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्याचे नियोजन करा.
महानगरपालिकेच्या जागेवर वसलेल्या 4 झोपडपट्यांमध्ये 1719 पट्टेधारक असून यामध्ये तकीया धंतोली, फकीरनगर, रामबाग आदी वस्त्यातील नागरिकांसाठी विशेष शिबिर लावून संपूर्ण प्रक्रिया 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करावी. यासाठी नगरसेवकांनीही ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर 5 झोपडपट्या असून यातील सुमारे 1512 पट्टेधारकांना पहिल्या टप्प्यात व उर्वरित वस्त्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण करुन संपूर्ण पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही यावेळी सांगितले.
शासनाच्या जागेवर असलेल्या 10 झापेडपट्यांमध्ये राहत असलेल्या झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ही जागा महसूल विभागाकडून महानगरपालिकेला हस्तांतरित करावी. यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करावा, असे निर्देश देताना 24 झोपडपट्टी अद्याप घोषित झालेल्या नसल्यामुळे प्रत्येक झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षणाचे काम पूर्ण करुन झोपडपट्टी घोषित करण्यासाठी शासनाकडे येत्या आठ दिवसात प्रस्ताव तयार करावा. झुडपीजंगल असलेल्यावर जागेवरील झोपडपट्या नियमित करण्यासाठी केंद्र शासनाच्या परवानगीसाठी प्रस्तावाचा पाठपुराव करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जाटतरोडी, बोरकर नगर, इंदिरानगर जाटतरोडी, कुंदनलाल लॉयब्ररीच्या मागे बोरकर नगर, काफला वस्ती, टिंबर मार्केट, शिफर कॉलोनी, इमामवाडा, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, पवारटोली (दीक्षाभूमी), कैकाडी नगर, परसोडी, कामगार कॉलोनी व संत तुकडोजी नगर आदी झोपडपट्टी राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना यावेळी संबंधित विभागाला देण्यात आली. यासाठी या भागात विशेष कॅम्प लावावा, तसेच नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
प्रारंभी विशेष कार्य अधिकारी आशा पठाण यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील घोषित झोपडपट्यांतर्गत पट्टे वाटप व शासनस्तरावर झोपडपट्टी घोषित करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे, महसूल विभागाकडे असलेले झोपडपट्या महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनस्तरावर मंजूर करणेबाबत बैठकीत माहिती दिली. यावेळी नगरसेवकांनी पट्टेवाटपासंदर्भात विविध सूचना केल्या त्यानुसार पट्टेवाटपाची प्रक्रिया राबवावी, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
सत्तापक्ष नेते संदीप जोशी तसेच प्रा. राजीव हडप यांनी पट्टेवाटपाची प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विविध सूचना केल्या.