Published On : Fri, May 11th, 2018

नागपूर जिल्हा परिषदेचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी निंबाळकर एसीबीच्या जाळ्यात

bribe
नागपूर: भ्रष्टाचारबाबत चौकशी प्रकरणात तक्रारकर्ती विरूध्द् कोणतीही कार्यवाही न करता प्रकरण बंद  (फाईल) करण्याकरिता तक्रारकर्तीस १ लाख रुपये  लाचेची मागणी करून ५० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नागपूर जिल्हा परिषदेचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी  अरूण सखाराम निंबाळकर (५७) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ग्रामपंचायत चिचाळा ता.  भिवापूर जि. नागपूर येथे ग्रामसेवक  या पदावर  नेमणुकीस आहे. तक्रारकर्ती कडे ऑगस्ट २०१६ ते जुन २०१७ पर्यंत गट ग्रामपंचायत नांद  येथील अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.  चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत साहीत्य खरेदी  व बांधकामाच्या  कामामध्ये गट ग्रामपंचायत नांद येथे झालेल्या भ्रष्टाचारबाबत तक्रारदार ग्रामसेविके विरूध्द् चौकशी सुरु  होती.सुरु असलेल्या  चौकशी प्रकरणात गट  विकास अधिकारी पंचायत समिती भिवापूर यांनी चौकशी करून त्याबाबतचा अहवाल उप-मुख्य कार्यकारी अधिकारी  अरूण  सखाराम निंबाळकर यांच्याकडे पाठविला होता.

सदर  प्रकरणात तक्रारकर्ती विरूध्द् कोणतीही कार्यवाही न करता प्रकरण बंद  (फाईल) करण्याकरिता तक्रारकर्तीस १ लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारकर्तीस निंबाळकर यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम देण्याची  इच्छा नसल्याने  त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक  विभाग, भंडारा येथे तक्रार नोंदविली. तक्रारकर्तीने दिलेल्या तक्रारीवरून आज ११ मे  रोजी सापळा रचून   अरूण सखाराम निंबाळकर  यांनी लाचेचा  पहिला हप्ता म्हणुन ५० हजार  रू लाचरक्कम स्विकारली. यावरून  आरोपी विरूध्द पो. स्टे. सदर, नागपूर शहर येथे लाप्रका १९८८ अन्वये गुन्हा दाखल  करण्यात आला  आहे.

सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे   पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात  पोलीस उपअधीक्षक   दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक  योगेश्वर पारधी, पो.ना. गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, रविन्द्र गभणे, दिनेष धार्मिक   यांनी यशस्वी केली आहे.