Published On : Thu, May 27th, 2021

‘सोबत’च्या सोबतीला सदैव उभा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Advertisement

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पाचा शुभारंभ

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आई, वडील किंवा दोघांचेही छत्र हरविलेल्या पाल्यांसाठी संदीप जोशी यांनी सुरू केलेल्या ‘सोबत’ पालकत्व या प्रकल्पाच्या सोबतीला सैदव उभा राहिन, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने माजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट द्वारा संचालित ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पाचा शुभारंभ, क्रीडा प्रशिक्षक, कलावंत यांना धान्य किट वितरण, कोव्हिड योद्धा, फ्रंट लाईन वर्कर यांचा सत्कार, ‘अनमास्किंग इंडिया’ या पुस्तकाचे वितरण असे संयुक्त सामाजिक कार्याची सुरूवात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. यावेळी ते बोलत होते.

लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहामध्ये सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, माजी महापौर संदीप जोशी उपस्थित होते.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना, ज्या संकल्पावर आपले नेते चालतात, ज्या समाजसेवेचा त्यांनी वसा घेतला आहे. त्या संकल्पात आणि त्या समाजसेवेमध्ये आपण सहभागी व्हायचे व आपल्या माध्यमातून त्यात भर घालायची. ही देशातील अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या वाढदिवसाची माजी महापौर संदीप जोशी यांनी दिलेली अगदी योग्य भेट आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी माजी महापौर संदीप जोशी यांच्या कार्याचा गौरव केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात ‘इन्फ्रास्ट्रक्चर’च्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती आणली आहे. आज भारताचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ म्हणून त्यांचा गौरव होत आहे. मात्र यासोबतच विविध सामाजिक प्रकल्प सुद्धा त्यांनी सुरू केले. आदिवासी दुर्गम भागासाठी शेकडो एकल प्रकल्प, वेगवेगळ्या रोजगाराभिमुख योजना, तळागाळातील व्यक्तींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी अनेक सामाजिक प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरू केले आहेत. कोव्हिडमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली असताना त्यांनी स्वत: त्यात लक्ष घालून आवश्यक त्या सर्व आरोग्य व्यवस्था करण्यासाठी अहोरात्र कार्य केले. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून कुठलीही तक्रार न करता राज्य सरकारशी समन्वय साधून कार्य केले. आज कोव्हिडमध्ये ज्यांचे हसते खेळते कुटुंब उद्धवस्त झाले, कर्ता पुरूष गेला अशांचे पालकत्व स्वीकारणे, क्रीडा महोत्सवाद्वारे ज्या खेळाडू आणि प्रशिक्षणकांना ओळख मिळाली त्यांच्यासोबत आज भक्कमपणे उभे राहणे आणि इतर कार्याद्वारे सकारात्मक आणि रचनात्मक नेतृत्व असलेल्या आपल्या नेत्याचा अशाच सामाजिक कार्याद्वारे वाढदिवस साजरा करणे ही खूप मोठी उपलब्धी असल्याचे सांगत ना. देवेंद्र फडणवीस यांनी संदीप जोशी यांचे अभिनंदन केले.

सुरूवातीला श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टकडे ‘सोबत’ पालकत्वाकरिता जवळपास १०० नोंदणी प्राप्त झालेल्या असून त्या सर्व १०० कुटुंबातील मुलांचे आपण स्वीकारत असल्याचे यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. याशिवाय दक्षिण पश्चिम या त्यांच्या मतदार संघातील छत्र हरविलेल्या पाल्यांचे सुद्धा पालकत्व स्वीकारण्याचे त्यांनी जाहीर केले. ‘सोबत’द्वारे शिक्षण, आरोग्य, आहार, समुपदेशन आणि कौशल्य विकासावर कार्य केले जाणार आहे. यामध्ये कुठल्याही पाल्याला अत्यावश्यक आरोग्य सेवेची नागपूरबाहेर मुंबई वा अन्य मोठ्या शहरात गरज पडल्यास त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्वीकारली.

कोरोडीचे महालक्ष्मी जगदंबा संस्थानही ‘सोबत’च्या साथीला

यावेळी बोलताना माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त सुरू केलेल्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. आजच्या स्थितीत अत्यंत गरजेचा हा प्रकल्प असून हा सेवा प्रकल्प पुढे अविरत सुरू राहणे आवश्यक असून कोराडीचे महालक्ष्मी जगदंबा संस्थांन नेहमी ‘सोबत’च्या साथीला असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूरपाठोपाठ वर्धा, चंद्रपूरलाही ‘सोबत’

प्रास्ताविकामध्ये माजी महापौर संदीप जोशी यांनी संपूर्ण ‘सोबत’ प्रकल्पाची आणि संपूर्ण उपक्रमाची भूमिका मांडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदैव सामाजिक बांधिलकी जपली. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याचा त्यांचा मुलमंत्र कार्य करण्याची प्रेरणा देते. आज कोव्हिडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेउन नवे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करीत असून तो पुढे अविरत सुरू ठेवणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोव्हिडच्या काळामध्ये अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले. अशाच एका रात्री एका भगीनीचा फोन येतो, पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला, नउ महिन्याचे बाळ आहे त्याला बाहेरचेच दुध द्यावे लागते मात्र त्यासाठी पैसे नाहीत. त्या भगीनीची व्यवस्था करून देण्यात आली. मात्र अशा कितीतरी भगीनी डोळ्यापुढे येउ लागल्या. पतीच्या मृत्यूमुळे गरोदर राहिलेल्या अनेक भगीनींनी गर्भपात केल्याच्या घटना आहेत. शहरात एकाच रुग्णालयात अशा १० महिलांनी गर्भपात केल्याची माहिती आहे. अशा अनेक घटना स्तब्ध करणा-या आहेत. यांच्यासाठी आपण काही करावे ही जाणीव स्वस्थ बसू देत नसताना श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ‘सोबत’ची संकल्पना अस्तित्वात आली. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील ८५०० वर अधिक अशा कुटुंबांची ट्रस्टकडे विचारपुस झालेली आहे. शहरातील तीन हजारावर कुटुंब आहेत. या सर्वांमधील जे स्वत:चा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ आहेत, अशांना प्राधान्यांने मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागपूर नंतर वर्धा, चंद्रपूर येथेही सोबतचे काम सुरू करण्याचा मानसही माजी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

सत्कारमूर्ती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्या टप्प्यात १०० पाल्यांचे ‘सोबत’ने पालकत्व स्वीकारले असून प्रतिकात्मक स्वरूपात पाच कुटुंबांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तुंची किट देउन पालकत्व स्वीकारण्यात आले. यामध्ये दिवंगत उमेश पानबुडे, दिवंगत रामु भोयर, दिवंगत संघपाल लोखंडे, दिवंगत सुधीर सावरकर, दिवंगत तुषार ठावरे यांच्या कुटुंबियांना किट प्रदान करून पालकत्व स्वीकारण्यात आले.

याशिवाय १०० क्रीडा प्रशिक्षकांना अन्नधान्याच्या किट प्रदान करण्यात येणार असून प्रतिकात्मक स्वरूपात संदीप गवई, दिपाली सहारे, प्रलाश जोशी या प्रशिक्षकांना तर सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंत जाधव, माधुरी पानतावणे, नितेश परिहार या कलावंतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अन्नधान्याच्या किट प्रदान करण्यात आल्या.

कोव्हिड काळामध्ये अहोरात्र सेवा बजावणा-या डॉक्टरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वानाडोंगरीतील शालिनीताई मेघे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.दिलीप गोडे, लता मंगेशकर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल)चे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल)च्या उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. कांचन वानखेडे, एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो)चे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्यासह खासगी रुग्णालयाचे डॉ. कमल भूतडा, डॉ. शैलेश कोठाळकर, मनपाचे अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. सागर नायडू, डॉ.शुभम मनघाटे तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त डॉ. पी.एम. बल्लाड यांचाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मेडिकलच्या परिचारिका वैशाली तायडे, मेयोच्या परिचारिका साधना गोमासे, लता मंगेशकर रुग्णालयातील रिता जॉन यांच्यासह आशा वर्कर रेखा दडमल, अनिता नारनवरे यांनाही सन्मानित करण्यात आले.

कोरोना काळामध्ये मृतदेह उचलून त्यांचे अंत्यसंस्कार करण्याची मोलाची कामगिरी पार पाडणा-या सफाई कर्मचा-यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रतिकात्म स्वरूपात जयंत कांबळे, आकाश रंगारी व दुर्गेश मानकर यांचा गौरव करण्यात आला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचा आढावा घेणा-या ‘अनमास्किंग इंडिया’ या ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे व सरिता कौशिक यांनी संपादित केलेल्या पुस्तकाकरिता २०० जणांची नोंदणी झालेली आहे. यापैकी प्रतिकात्मक स्वरूपात राजाभाउ नाईक व संतोष आळशी अशा दोन जणांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तक प्रदान करण्यात आले.