Published On : Fri, Feb 26th, 2021

दादासाहेब- शेतकर्‍यांच्या विकासासाठी कटिबध्द होते : ना. गडकरी

‘आमचे दादासाहेब’ पुस्तकाचे विमोचन

नागपूर: स्व. दादासाहेब टिचकुले एक हुशार विद्यार्थी होते. व्हीएनआयटीतून मेकॅनिकलची पदवी त्यांनी उत्तीर्ण केली होती. ठाणे जिल्ह्यात काही काळ त्यांनी नोकरी केली. पण समाज आणि शेतकरी विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. शेतकर्‍यांच्या विकासासाठी ते कटिबध्द होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

‘आमचे दादासाहेब- ध्यास समृध्द समाजाचा’ या पुस्तकाचे विमोचन आज ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले- विशेषत: भंडारा जिल्हयातील शेतकर्‍यांच्या विकासासाठी त्यांनी कठीण काळात संघर्ष केला. त्या भागात साखर कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाही. नंतरच्या काळात वैनगंगा साखर कारखाना तयार झाला आणि शेतकर्‍यांना बराच आधार मिळाला. समाजाची सेवा केली. सामूहिक विवाहासारखे कार्यक्रम आयोजित करून त्यांनी अनेकांना आधार दिला, असेही ना. गडकरी म्हणाले.

https://fb.watch/3UD7W0ZGoS/

दादासाहेबांचा रा.स्व. संघाशी जुना संबंध होता. यामुळेच त्यांची नाळ भाजपशी जोडली गेली. अत्यंत कठीण काळात त्यांनी पक्षाचे काम केले. आज चांगले दिवस आले असताना ते नाहीत याची मला खंत आहे, असे सांगताना न. गडकरी म्हणाले- गाव, गरीब व शेतकरी विकासाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांचा संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. या पुस्तकातून त्यांच्या कार्याचा आवाका किती मोठा आहे हे लक्षात येते, असेही ते म्हणाले.