Published On : Wed, Sep 18th, 2019

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला आजपासून प्रारंभ

प्लास्टिकमुक्तीसाठी जनजागृती रॅली : महापौर नंदा जिचकार करणार अभियानाचा शुभारंभ

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. उद्या बुधवारी (ता.१८) दुर्गा मंदिर प्रतापनगर ते माटे चौक दरम्यानच्या रॅलीला सकाळी ८ वाजता महापौर नंदा जिचकार निर्मूलन जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवितील व अभियानाचा शहरात शुभारंभ करतील. यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, आरोग्य समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका सोनाली कडू आदी उपस्थित राहतील.

शहरातील संपूर्ण ३८ प्रभागांमध्ये प्लास्टिक निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ११ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान प्लास्टिकबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यानंतर २ ऑक्टोबरला शहरात लोकसहभागातून श्रमदान व प्लास्टिक गोळा करण्यात येणार आहे. ३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान गोळा झालेल्या प्लास्टिकचा विविध पद्धतीने पुनर्वापराच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रियेसाठी ते प्लास्टिक पाठविणे व प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी प्लास्टिक निर्मूलन मोहीमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.