१४ फेब्रुवारीपर्यंत थकीत कर भरा, सवलतीचा लाभ घ्या
नागपूर : थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या ‘अभय योजने’ची मुदत संपत आली असून अखेरचे ५ दिवस शिल्लक आहेत. मालमत्ता कर ५० टक्के शास्ती माफीचा १४ फेब्रुवारी अखेरचा दिवस आहे.
त्यामुळे नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरून ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा व आपली पाटी कोरी करावी असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
मनपाने ‘अभय योजना’ जाहीर केल्यानंतर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मनपा प्रशासनाने मालमत्ता करावरील शास्तीत ५० टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार १४ फेब्रुवारी २०२१ दरम्यान थकीत मालमत्ता कर एकमुस्त भरल्यास शास्तीत ५० टक्के सवलत मिळणार आहे.
पाणी कराच्या शास्तीत ७० टक्के सवलत
थकीत मालमत्ता व पाणी कर नागरिकांनी भरून आपली पाटी कोरी करावी यासाठी मनपाद्वारे १५ डिसेंबर २०२० पासून ‘अभय योजना’ सुरू आहे. पाणी कराच्या थकित रक्कमेवरील शास्तीत ७० टक्के माफीच्या दुसरा टप्पा दि. १ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाला. करदात्यांना महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आवाहन केले आहे की, २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत थकित पाणी कर नागपूर महानगरपालिका निधीत जमा करुन शास्तीत ७० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा.
