Published On : Tue, Feb 9th, 2021

फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लीनेन यांची मनपाला भेट

Advertisement

नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पावर चर्चा : प्रकल्पाच्या दुस-या टप्प्यात सहकार्य करण्याचे आयुक्तांचे आवाहन

नागपूर: फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लीनेन (Emmanuel Lenain) यांच्यासह कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई सोनिया बार्ब्री (Sonia Barbry) यांनी मंगळवारी (ता.९) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस. यांनी त्यांचे तुळशीचे रोपटे देवून स्वागत केले.

नागपूर स्मार्ट सिटीच्या च्या सभागृहामध्ये फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लीनेन व कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई सोनिया बार्ब्री यांनी शहरातील नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासंदर्भात चर्चा केली. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., एनएसएससीडीसीएल च्या सीईओ भुवनेश्वरी एस., अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, एनएसएससीडीसीएल चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने, महाव्यवस्थापक राजेश दुफारे, नाग नदी प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इसराईल, महाव्यवस्थापक डॉ.प्रणीता उमरेडकर, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी)चे रिजनल डायरेक्टर फॉर साउथ एशिया जॅकी एम्प्रो (Jacky AMPROU), कंट्री डायरेक्टर फॉर इंडिया ब्रून बोल (Bruno Bosle), स्मार्ट सिटीचे डॉ. पराग अरमल, डॉ. संदीप नारनवरे, डॉ. मानस बडगे आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्तांनी नागपूर शहराविषयी माहिती दिली. नागपूर शहर हे देशातील ऐतिहासिक शहर असून शहराच्या मध्यभागातून वाहणारी नाग नदी हे शहराचे वैभव आहे. कालाच्या ओघात नदीचे सौंदर्य बाधित झाले. त्यामुळे या नदीच्या पुनरूज्जीवनासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाबाबत केंद्र सरकार आणि जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ (जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) यांच्यामाध्यमातून कार्य होत आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च २११७.७१ कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून ६० टक्के म्हणजे १३२३.५१ कोटी, राज्य शासनाकडून २५ टक्के म्हणजे ४९६.३८ कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे २९७.८२ कोटी खर्च केला जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरामध्ये ६५० एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. यापैकी सुमारे ५३० एमएलडी पाणी सिवेजमध्ये परिवर्तीत होउन नदीत सोडले जाते.

तर यापैकी ३५० ते ३६० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. नाग नदीला प्रदूषणमुक्त करून नदीच्या सौंदर्यीकरणाचे कार्य पुढच्या टप्प्यात होणार आहे. नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत दुस-या टप्प्यात होणा-या सौंदर्यीकरण कार्यासाठी एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी)चे मोठे सहकार्य लागणार आहे. याशिवाय शहरात दररोज कचरा विलग केला जात असून यातील प्लॉस्टिक कच-यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पही राबविण्यात येणार आहे. प्लास्टिक कच-याचे विल्हेवाट करण्यासाठी फ्रान्सचे तांत्रिक सहकार्याची आवश्यकता आहे. नागपूर शहरातील नाग नदी पुनरूज्जीवन व प्लॉस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. या प्रकल्पाला पर्यावरणाच्या दृष्टीने पोषक व लाभदायी करण्यासाठी एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी)ने आर्थिक व तांत्रिक सहकार्य करावे. तसेच प्रकल्पाच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक तज्ज्ञ नियुक्त करण्यात यावे, असे आवाहन यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लीनेन यांनी नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पामध्ये रूची दर्शविली. नागपूर शहरामध्ये ‘एएफडी’चे अनेक प्रकल्प सुरू असून या प्रकल्पाबाबतही सहकार्याच्या दृष्टीने विचार करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच तयांनी प्लास्टिक कच-याचे व्यवस्थापन बददल मनपाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यापूर्वी एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी)चे रिजनल डायरेक्टर फॉर साउथ एशिया जॅकी एम्प्रो (Jacky AMPROU), कंट्री डायरेक्टर फॉर इंडिया ब्रून बोल (Bruno Bosle) यांनी अंबाझरी पासून विविध भागात नाग नदीची पाहणी केली.

बैठकीत प्रारंभी नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इसाराईल यांनी प्रकल्पाची सुरूवातीपासूनची विस्तृत माहिती सादर केली.