Published On : Tue, Feb 9th, 2021

रक्तदान शिबिरांसाठी विविध समाजाचे सहकार्य घ्या : महापौर दयाशंकर तिवारी

मनपाच्या रक्तपेढीचा लाभ सर्वांना घेण्यासाठी महापौरांचा पुढाकार : प्रसिद्धी करण्याचे निर्देश


नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात रक्तपेढी आहे. ही रक्तपेढी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांसाठी वरदान ठरु शकते. या रक्तपेढीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी अधिकाऱ्यांनी त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे. सोबतच वर्षभर विविध औचित्य साधत रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे जेणेकरून या रक्तपेढीचा लाभ गरीबांना मिळण्याच्या दृष्टीने समाजाचेही योगदान असेल, त्यादृष्टीने वर्षभराचे नियोजन करण्याच्या सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिल्या.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना आणि प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, क्रीडा समितीचे सभापती प्रमोद चिखले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त (कर) मिलिंद मेश्राम, नगर रचना सहायक संचालक हर्षल गेडाम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिलू गंटावार आदी उपस्थित होते.

Gold Rate
26 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,400 /-
Gold 22 KT ₹ 1,06,400 /-
Silver/Kg ₹ 1,38,100/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने गांधीनगर येथील रुग्णालयात रक्तपेढी संचालित करण्यात येते. ही रक्तपेढी लोकसेवेच्या भावनेतूनच संचालित करण्यात येत असल्याने त्याची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी, यासाठी त्याची योग्य पद्धतीने प्रसिद्धी करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या. मनपाही एक रक्तपेढी संचालित करते जी आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या लोकांना परवडणारी आहे, हा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायलाच हवा. त्यादृष्टीने या रक्तपेढीची व्यापक प्रसिद्धी मोहीम संबंधितांनी हाती घ्यायला हवी. रक्तपेढीमध्ये मुबलक रक्तसाठा राहण्यासाठी वर्षभरात रक्तदानाचे विविध उपक्रम राबविण्याची सूचनाही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली. दरवर्षी प्रत्येक समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा समाजातर्फे मोठे आयोजन करण्यात येते. या समाजातील नेत्यांसोबत, प्रतिष्ठीत नागरिकांसोबत संपर्क साधून रक्तदानाचे आयोजन केल्यास समाजाचे मोठे योगदान लाभेल. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधून रक्तदान शिबिरांचे आयोजन केल्यास रक्तपेढीत पुरेसा साठा उपलब्ध राहील. वर्षभरात अशा रक्तदान शिबिराचे कॅलेंडर तयार करा आणि त्या दिशेने नियोजन करा, असेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले.

Advertisement
Advertisement