Published On : Wed, May 23rd, 2018

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागाचा उद्या शेवटचा दिवस

मुंबई: राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असून या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील युवकांना मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम-2018 च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचा उद्या (दि. 24 मे) शेवटचा दिवस असून त्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञानात त्यांना असलेली गती याचा फायदा प्रशासनास व्हावा यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून प्रतिभावान युवकांना प्रशासनात सहभागी होण्यासह राज्याच्या विकासाला हातभार लावता येणार आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचे यंदा चौथे वर्ष असून गेल्या तीन वर्षात या कार्यक्रमाला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. दरवर्षी साधारण चार हजार अर्ज प्राप्त होत असून त्यातून ५० युवकांची निवड केली जाते. मुख्यमंत्री फेलोशिप हा 11 महिन्यांचा पूर्णवेळ कार्यक्रम असून त्यात एकदाच सहभागी होता येते. कोणत्याही शाखेचा प्रथमवर्ग पदवीधर असणाऱ्या 21 ते 26 वर्षे वयोगटातील युवकांना 24 मे 2018 पर्यंत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करता येईल. अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी http://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देता येईल.

Advertisement

फेलोजच्या निवडीसाठी ऑनलाईन परीक्षा, निबंध व मुलाखत अशी निवडप्रक्रिया राबविली जाते. फेलोशिपच्या कालावधीत विविध विभागांसोबत काम करण्याच्या अनुभवासोबतच विविध मान्यवर संस्था व व्यक्तींसोबत संवाद साधण्याची संधीही फेलोजना मिळत असते. त्यामुळे राज्याच्या प्रशासनात आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement