नागपूर: प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सहज व सूलभपणे संगणकीकृत सातबारा तसेच आठ अ सारखे आवश्यक असलेले दस्ताऐवज उपलब्ध करुन देण्यासाठी पटवाऱ्यांसोबतच तालुका स्तरावर नायब तहसिलदारांना लॅपटॉप उपलब्ध करुन देण्याचा अभिनव उपक्रम जिल्हयात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते आज डाटाबेस अधिकारी म्हणून नायब तहसिलदारांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लॅपटॉप उपलब्ध करुन देण्याच्या या उपक्रमास उपजिल्हा नियोजन अधिकारी राजू कळमकर, उपजिल्हाधिकारी रविंद्र खजानजी , तसेच एनआयसीच्या क्षमा बोरोले आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हयातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा संगणकीकृत सातबारा देण्याचा विशेष उपक्रम जिल्हयात राबविण्यात येत असून त्याअंतर्गत 426 पटवाऱ्यांना 70 मंडळ अधिकाऱ्यांना या पूर्वी लॅपटॉपचे वितरण करण्यात आले असल्याचे सांगतांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांच्या मध्ये समन्वयासोबत संगणकीकृत सातबारा नियंत्रण व वितरण अधिकारी म्हणून नायब तहसिलदार यांनाही लॅपटॉप उपलब्ध करुन देणे आवश्यक होते.
डाटाबेस अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून तालुक्यातील संगणकीकृत सातबारासंदर्भात तालुक्यातील एकत्र माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.