नागपूर – नागपूर शहरात सार्वजनिक शौचालयांची कमतरता गंभीर स्वरूप धारण करत आहे. घराबाहेर शौचालयाचा वापर करणे नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरत असून, विशेषतः महिलांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, ही परिस्थिती लवकरच बदलू शकते. नागपूर महानगरपालिका याबाबत गंभीर असून सार्वजनिक शौचालयांची संख्या दुप्पट करण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी विभाग नव्या सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीवर भर देत आहे. सध्या नागपूर शहरात १५० शौचालयांची गरज असल्याचे मनपाने सांगितले असून, त्यानुसार कामाला गती दिली आहे. या नव्या शौचालयांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे. शिवाय ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.
पायलट प्रोजेक्टअंतर्गत सुरू ३६ स्मार्ट टॉयलेट्सचे काम-
सध्या पायलट प्रोजेक्टच्या अंतर्गत १६ कोटी रुपयांहून अधिक खर्च करून ६ टप्प्यांमध्ये ३६ आधुनिक शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. या शौचालयांमध्ये इतरही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शिवाय, जुन्या शौचालयांचे नुतनीकरण देखील करण्यात येत आहे.
सात एस्पिरेशनल टॉयलेट्स होणार उभारले-
या ३६ टॉयलेट्सव्यतिरिक्त नागपूर महानगरपालिका ७ एस्पिरेशनल टॉयलेट्स उभारणार आहे, जे विशेषतः ट्रान्सजेंडर आणि दिव्यांगांसाठी सुसज्ज असतील. ट्रान्सजेंडर समुदायाने यासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली होती, ती आता पूर्ण होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
शहर विकासामुळे झाले नुकसान, आता भरपाईचे प्रयत्न-
नागपूर शहरात झालेल्या विविध विकासकामांमुळे अनेक सार्वजनिक शौचालयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपाने याची भरपाई करण्यासाठी नव्या शौचालयांसाठी जागांची शोधमोहीम सुरू केली असून, लवकरच ही सुविधा अधिक व्यापक प्रमाणावर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.