नागपूर – विदर्भाच्या युवा आणि तेजतर्रार ऑलराउंडर हर्ष दुबेला इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने दुखापतग्रस्त स्मरण रविचंद्रनच्या जागी हर्ष दुबेची निवड केली आहे.
22 वर्षीय हर्ष दुबे याने यंदाच्या हंगामासाठी नोंदणी केली होती, मात्र नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मेगा लिलावात कोणत्याही संघाने त्याला खरेदी केलं नव्हतं. त्याचा बेस प्राइस २० लाख रुपये होता. सुरुवातीला अनसोल्ड राहिल्यानंतर आता SRH ने त्याला ३० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात घेतलं आहे.
हर्ष दुबेने रणजी ट्रॉफी 2024-25 हंगामात चमकदार कामगिरी करत १० सामन्यांमध्ये ६९ विकेट्स घेतल्या आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने आतापर्यंत १८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९४ विकेट्स घेतल्या आहेत आणि ७०९ धावा सुद्धा केल्या आहेत. त्याच्या नावावर ८ वेळा एका डावात पाच विकेट्स आणि ७ अर्धशतके आहेत.
सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी हर्ष दुबेची संघात भर घातली आहे. स्थानिक क्रिकेटमधील त्याची कामगिरी लक्षात घेता, आता तो IPLमध्ये काय कमाल करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.