Published On : Fri, Nov 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

डिलिमिटेशन विधेयकाला राऊतांचाही पाठिंबा, पण राजकीय विरोधासाठी भूमिकेत बदल; महसूल मंत्री बावनकुळेंचा दावा

काँग्रेससह ठाकरे गटाला भूमिकेचा फेरविचार करण्याचे आवाहन
Advertisement

डिलिमिटेशन विधेयकाला राऊतांचाही पाठिंबा, पण राजकीय विरोधासाठी भूमिकेत बदल; महसूल मंत्री बावनकुळेंचा दावा

नागपूर : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह विरोधकांवर टीकास्त्र सोडले. डिलिमिटेशन विधेयक मंजूर व्हावे, अशी इच्छा संजय राऊत यांचीही आहे. मात्र, राजकीय विरोधाची भूमिका घेतल्यामुळे त्यांना जाहीरपणे या विधेयकाच्या विरोधात बोलावे लागत असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावला.

मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास लोकप्रतिनिधींना आपल्या क्षेत्रातील नागरिकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. सध्या चार ते पाच लाख मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांची व्याप्ती कमी झाल्यास विकासकामांवर अधिक प्रभावीपणे लक्ष देता येईल. तसेच महिलांच्या आरक्षणाच्या दृष्टीनेही हे विधेयक महत्त्वाचे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील मतदारसंघांची संख्या ५० टक्क्यांनी वाढल्यास सरकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केल्यास त्या लोकप्रतिनिधींच्या हिताच्या बाजूने उभ्या राहतील, असे बावनकुळे म्हणाले. हा केवळ एनडीएचा राजकीय विषय नसून सर्व लोकप्रतिनिधींशी संबंधित मुद्दा आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनेही याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता पुनर्विचार करावा. राहुल गांधी यांनी आपल्या पक्षातील खासदारांची मते जाणून घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले. नागपूरमधील काँग्रेस खासदारांनाही हे विधेयक मंजूर व्हावे, असे वाटते. मात्र, राहुल गांधी आमच्या इच्छेविरुद्ध भूमिका घेत असल्याची खंत संबंधित खासदारांनी आपल्याकडे व्यक्त केल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला. महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक खासदार विधेयकाच्या समर्थनात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊत यांनी खासदारांबाबत केलेल्या विधानावरही बावनकुळे यांनी आक्षेप घेतला. सर्व खासदारांना १५० कोटी रुपयांचे आरोपी ठरवणे चुकीचे असून, अशा विधानांमुळे लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो. राऊत यांनी अशा प्रकारची वक्तव्ये टाळून खासदारांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement

दुसरीकडे, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या वाळू माफियांविरोधात सरकारने कठोर पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले असून, अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. डिलिमिटेशन विधेयकाला मोठ्या बहुमताने मंजुरी मिळेल आणि त्यातून देशाच्या राजकीय व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.