Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jun 4th, 2018

  मनपाच्या अर्थसंकल्पात व्यापाऱ्यांच्या सूचनांना अंतर्भूत करणार : वीरेंद्र कुकरेजा

  नागपूर: ‘ग्रीन सिटी क्लीन सिटी’ या संकल्पनेवर आधारीत यावर्षीचा नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी समाजातील विविध घटकांच्या सूचना आपण जाणून घेत आहोत. व्यापारी हा त्यापैकी एक महत्त्वाचा घटक असून त्यांच्या सर्व सूचनांचे स्वागत आहे. या सूचनांना अर्थसंकल्पात अंतर्भूत करु. विशेष म्हणजे याच सूचनांच्या आधारे शहरातील सर्व बाजार परिसरात स्वच्छतागृहांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करणार असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले.

  व्यापाऱ्यांच्या दृष्टीकोनातून अर्थसंकल्पात काय असावे हे जाणून घेण्यासाठी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी (ता. ४) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक निशांत गांधी, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम उपस्थित होते.

  सदर बैठकीत व्यापाऱ्यांनी एलबीटी वसुली, मालमत्ता कर, नागरी सुविधा याबाबत सूचना मांडल्या. एलबीटी संदर्भात बोलताना व्यापारी म्हणाले, एलबीटीसंदर्भात व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ज्या व्यापाऱ्यांकडून एलबीटीचा भरणा व्हायचा आहे, तो वसूल करण्यासाठी विविध व्यापारी असोशिएशन मनपाला मदत करेल. यासाठी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स येथे विशेष शिबिर लावण्याची सूचना श्री. हेमंत गांधी यांनी केली. हे शिबिर एका दिवसाकरिता नव्हे तर किमान १० दिवस असावे, अशीही सूचना आली. यासाठी व्यापारी आघाडी प्रचार करेल. अधिकाधिक एलबीटीची रक्कम या शिबिराच्या माध्यमातून वसूल होण्याचा प्रयत्न राहील, असेही श्री. गांधी म्हणाले. मालमत्ता करासंदर्भातही अनेक तक्रारी येत आहेत. यासाठी जो फॉर्म्यूला लावण्यात आला आहे, त्याची प्रसिद्धी करून जनजागृती करावी, असेही व्यापाऱ्यांनी सुचविले. खुल्या भूखंडाच्या डिमांड नोट मूळ मालकाच्या घरी जात नाही, तशी व्यवस्था करावी, बाजार परिसरात स्वच्छता गृहे नाहीत, जी आहेत त्याची साफसफाई होत नाही, त्यामुळे बाजार परिसरात नव्याने स्वच्छतागृहे बांधण्यात यावी, शाळांच्या परिसरात स्वच्छतागृहे तयार करण्यात यावी, मनपाच्या शाळा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना चालविण्यासाठी देण्यात याव्या, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या व्यावसायिक वाहनांचा बंदोबस्त करण्यात यावा अथवा त्यांच्याकडून दंड आकारण्यात यावा, अनेक बाजारात दुकानांसमोर होत असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशीही सूचना करण्यात आली.

  यावर बोलताना सभापती वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, स्वच्छतागृहांबाबतची सूचना आपण गांभीर्याने घेतली असून त्यासाठी अर्थसंकल्पातच विशेष तरतूद करण्यात येईल. व्यापारी असोशिएशनने यासाठी यादी पुरवावी, अशी विनंती त्यांनी केली. स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचीही विशेष काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. एलबीटी वसुलीसाठी व्यापारी आघाडीच्या सहकार्याने २० ते २७ जून दरम्यान नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात मनपातर्फे विशेष शिबिर लावण्यात येईल. याबाबतीत मनपातर्फे व्यापकर प्रसिद्धी करण्यात येईल. व्यापारी आघाडीनेही संघटनेमार्फत व्यापाऱ्यांना पत्र पाठवावे, अशी सूचना त्यांनी केली. नागपूर शहरातील मालमत्तेच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातुलनेत उत्पन्न कमी आहे. मागील वर्षी २०२ कोटी कर वसुली झाली. यावर्षी ५५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली. त्याचप्रमाणे पाणी करासंदर्भातही आपण नियमित पाठपुरावा करीत आहे. अवैध नळ कनेक्शनसंदर्भात विशेष मोहीम सुरू आहे. अमृत योजनेमधून पाण्याची गळती कमी होईल आणि पाणी कराच्या वसुलीतही वाढ होईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून नागपुरात कोट्यवधींची कामे सुरू आहेत. या विकासकामांमुळे त्रास होऊ नये, यासाठी मनपा आवश्यक त्या सेवा पुरविण्याचे कार्य करीत आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात उद्यान आणि क्रीडा मैदानांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. व्यापाऱ्यांनी कर वसुलीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सभापती श्री. कुकरेजा यांनी व्यापाऱ्यांचे आभार मानले.

  बैठकीला विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये सर्वश्री जे.पी. शर्मा, क्रिष्णा दायमा, राजेश कानुगो, विनोद जेठानी, सचिन पुनियानी, महेश बाथेजा, पंकज बक्शी, पंकज भोकारे, अर्जूनदास आहुजा, राजू व्यास, हेमंत गांधी, अशोक शनिवारे, राहुल जैन, उद्धव तोलानी, संजय वडलवार, राजेश मनियार, मनोज पोरसवानी, संजय अग्रवाल, राजेश गोयल यांचा समावेश होता.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145