Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jun 4th, 2018

  राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीज वापराचे ऑडिट करणार


  अहमदनगर: महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीज वापराचे येत्या तीन महिन्यात स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राळेगणसिद्धी येथे घोषित केले. यातून शेतकऱ्यांचा वीजवापर निश्चित होऊन वीजबिलाबाबतच्या तक्रारी राहणार नसल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांचा वीजवापर आणि वीजबिल यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी अण्णांची भेट घेऊन सोमवारी (४ जून) चर्चा केली व उपाययोजनांबाबत माहिती दिली.

  राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या वीजबिलाबाबत प्रश्न उपस्थित करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा देणारे पत्र मा. ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांना पाठविले होते. या पत्राची तातडीने घेऊन मा. ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी सोमवारी सायंकाळी अण्णा हजारे यांची भेट घेऊन सरकारकडून आखण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, शेतीपंपाच्या वीजवापराचे काटेकोर नियोजन व्हावे यासाठी, आयआयटी सारख्या नामांकित संस्थेकडून राज्यातील सर्वच कृषिपंपांच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्याच्या कालावधीत जिल्हानिहाय ऑडिट केले जाईल. या ऑडिटनुसार त्यानंतरच्या तीन महिन्यात हे बिल वसूल केले जाईल. कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला असून शेतीपंपाची थकबाकी २९ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. शेतकऱ्यांकडे व्याज, दंड वगळता १८ हजार कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. ऑडिटनंतर वीजबिलाबाबतच्या तक्रारी उरणार नाहीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


  मुख्यमंत्री सोलर कृषी वाहिनी योजनेला जमीन देणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याचे धोरण आखल्याचे मा. ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकणाऱ्या या योजनेला अधिक गती देण्यात येत आहे. राळेगणसिद्धी येथे या योजनेतून साकारत असलेल्या दोन मेगावॉट प्रकल्पाची पाहणी त्यांनी केली. या प्रकल्पात आणखी तीन मेगावॉटची क्षमता वाढविण्यास मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ही चर्चा व उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.


  दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई
  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अध्यक्ष असलेल्या राळेगणसिद्धी येथील कृष्णा पाणीपुरवठा संस्थेला अधिकचे वीजबिल पाठविल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी तातडीने कारवाई केली. कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145