नागपूर: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करणार आहे. शहरातील नाग, पिवळी, पोहरा नदीच्या काठावर आणि शहरात अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या पूर्वतयारीचा आढावा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सोमवारी (ता.४) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात घेतला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, वायुसेनेचे विंग कमांडर मनोज कुमार सिन्हा, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, (प्रभारी)मुख्य अभिंयता मनोज तालेवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त सर्वश्री राजेश कराडे,राजू भिवगडे, प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, हरिश राऊत, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता सी.जी.धकाते, मोती कुकरेजा, आर.एस भूतकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, उपअभियंता प्रदीप राजगिरे, मोहम्मद इजारईल, राजेश दुफारे प्रामुख्याने उपस्थित होते.
पर्यावरण दिनी महानगरपालिकेअंतर्गत कुठे-कुठे वृक्षारोपण करण्यात येणार आहे, याची माहिती संबंधित विभागप्रमुखामार्फत आयुक्तांनी घेतली. आरोग्य विभागाद्वारे भांडेवाडी येथे झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली. शिक्षण विभागाद्वारे मनपाच्या सर्व शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या क्रीडा संकुलांमध्ये तसेच खेळाचे मैदानांमध्ये क्रीडा विभागाद्वारे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहरातील तिन्ही नद्या नागनदी, पिवळी नदी, पोहरा नदी यांच्या काठावर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी दिली. जलप्रदाय विभागाद्वारे पेंच, गोरेवाडा येथील धरणाजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. परिवहन विभागाद्वारे खापरी बस डेपो, हिंगणा डेपो, मोरभवन बस स्टॉप येथे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली. आरोग्य विभागाद्वारे इंदिरा गांधी हॉस्पीटल, आयसोलेशेन हॉस्पीटल, पाचपावली सुतिकागृह, सदर आणि महाल येथील दवाखाने येथे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी यांनी दिली.
यानंतर महापालिकेच्या दहा झोनमध्ये होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमाबाबतची माहिती झोन सहायक आयुक्तांमार्फत आयुक्तांनी घेतली. लक्ष्मीनगर झोनअतंर्गत सकाळी ८.३० वाजता पोहरा नदीच्या काठावर सहकार नगर घाट येथे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याठिकाणी महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह हे उपस्थित राहतील. धरमपेठ झोनमध्ये हिलटॉप, रामनगर मैदान, फुटाळा शाळा, हजारीपहाड आणि रामनगर शाळा, हनुमान मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हनुमाननगर झोनअंतर्गत मानेवाडा घाट, भोला गणेश चौक, झोन कार्यालय, दुर्गानगर शाळा येथे, धंतोली झोनअंतर्गत नरेंद्र नगर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नेहरूनगर झोनमध्ये दिघोरी घाट, नरसाळा घाट आणि पोरा नदीच्या काठावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. गांधीबाग झोनमध्ये स्वीपर कॉलनी, मोमिनपुरा येथील मुस्लीम फुटबॉल मैदान, भानखेडा मैदान येथे, सतरंजीपुरा झोनअंतर्गत झोन कार्यालयात, बस्तरवारी शाळा आणि परिसरातील उद्यानात, लकडगंज झोनअंतर्गत कच्छीविसा मैदान, सतनामी मैदान, स्व. अण्णाभाऊ साठे सभागृह येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आसीनगर झोनअंर्गत झोन कार्यालयाच्या बाजुला असेलल्या मैदानात, वैशालीनगर घाट, यशोधरा उच्च प्राथमिक शाळा, सहयोगनगर मैदान येथे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मंगळवारी झोन अंतर्गत गोरेवाडा घाट, आकारनगर, मनपा दवाखाना, कुशीनगर मैदान येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
सर्व कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजता सर्व लावलेल्या झाडांची माहिती उद्यान विभागाला कळविण्यात यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. झाडे लावल्यानंतर त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे. सर्व स्थळावर खत आणि झाडे पुरविण्याची व्यवस्था उद्यान विभागाने करावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. ज्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी किती झाडे लावली आणि कोणती झाडे लावली याबाबतचे सूचना फलकही लावण्यात यावे, असे निर्देश आय़ुक्तांनी दिले.
मनपा मुख्यालयात सकाळी ८ वाजता महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र कंभारे यांनी दिली.










