नागपूर: उच्च न्यायालयाने शहरातील अतिउच्चदाबधारक वीजवाहिनी (हायटेंशन लाईन) खालील घरे हटविण्याचा आदेश दिल्याने धंतोली नगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १७ मधील गिरी नगर भागातील ५० ते ६० झोपड्या मागील ८ दिवसांपूर्वी हटविण्यात आल्या. मात्र, येथील नागरिकांचे पुनर्वसन न झाल्याने जवळपास ५०० नागरिकांना मुलाबाळांसह कुडकुडत्या थंडीत रात्र काढावी लागत आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने मागील दोन दिवसांपूर्वी दिलेल्या नवीन आदेशानुसार हायटेंशन लाईन खालील झोपड्यांना संरक्षण दिले आहे.
‘नागपूर टूडे’ प्रतिनिधीने प्रत्यक्षस्थळी जाऊन पाहणी केली असता गिरी नगर भागात ११ के.व्ही. दाबाच्या विद्युतवाहिनीखालील या झोपड्या मागील ३० वर्षांपासून वसलेल्या असल्याचे कळले. स्थानिक नागरिकांना वीज आणि पाण्याची अधिकृत सुविधा उपलब्ध करू देण्यात आली होती; परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हे अतिक्रमण हायटेंशन लाईनखाली येत असल्याने हटविण्यात आले. मात्र, असे करताना येथील नागरिकांचे अद्यापतरी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या गोरगरीब नागरिकांच्या वस्तीतील सर्वच जण मोलमजुरी करून प्रचंच भागवितात. आता घरकुल तुटल्याने सर्व सामान आणि मुलेबाळे रस्त्यावर आली असल्याने कामावर तरी कसे जावे? असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. रात्रीला थंडीचा जोर वाढू लागल्याने मुलाबाळांची आणि वृद्धांची प्रकृतीही बिघडत आहे. प्रशासनाने आम्हाला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गिरी नगर भागातील नागरिकांनी ‘नागपूर टूडेशी’ बोलताना केली. सध्या हे नागरिक अतिक्रम तोडलेल्या भागात तंबू उभारून राहत आहेत. लहान मुलांच्या तब्येतीचा आणि घरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने कामावर जाऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत विजय चुटेले यांनी आम्हाला मदत केल्याचेही येथील महिलांनी ‘नागपूर टूडेला’ सांगितले.
साहेब! आम्हाला घर भेटन्ं का जी?
— पै पै जोडून कमावलेल्या पैशात स्वतःची मेहनत ओतून लेकराबाळांसाठी घर बांधले होते. मात्र, हायटेंशन लाईनखाली असल्याने अतिक्रमण विरोधी पथकाने घर पाडले. मुख्य म्हणजे, असे करण्यापूर्वी नागरिकांचे पुनर्वसन करणे ही प्रशासनाची जबाबदारी होती. याला दुसरा पर्याय म्हणजे हायटेंशन लाईनला भूमिगत करून गरिबांची घरे वाचविला आली असती; मात्र असे न झाल्याने आपले घर तुटल्याची हळहळ नागरिकांनी व्यक्त केली. काहींनी तर ‘‘साहेब! आम्हाला पुन्हा घर भेटनं का जी?’ असा भावनिक प्रश्नही विचारला.
बेघरांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देऊ – विजय चुटेले
— उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून गिरी नगर भागातील हायटेंशन लाईनखालील झोपड्या हटविण्यात आल्या आहेत; यामुळे बेघर झालेल्या नागरिकांचे समायोजन ‘प्रधानमंत्री आवाय योजनेअंतर्गत’ करण्यासाठी आपल्यावतीने नागपूर मनपा आयुक्त अभिजीत बांगर आणि सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांना निवेदन देण्यात आले आहे, असे नगरसेवक विजय चुटेले यांनी ‘नागपूर टूडे’ प्रतिनिधीला सांगितले. येत्या ४ ते ५ दिवसात आयुक्तांसोबतच बैठक करून नागरिकांंचे सन्मानजनक पुनर्वसन करण्यात येणार असल्याही चुटेले म्हणाले.