
नागपूर : महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या कोराडी तलावाच्या स्वच्छता व पुनरुज्जीवन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी तलावाचे संवर्धन, जलसाठा क्षमता वाढविण्यासाठी करण्यात येणारा गाळ उपसा, परिसरातील स्वच्छता मोहीम तसेच पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.
या प्रकल्पामुळे कोराडी तलावाचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार असून, स्थानिक पर्यावरण संवर्धनासह जलस्रोत व्यवस्थापनालाही मोठी चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पाहणीदरम्यान बावनकुळे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व कामे गुणवत्तापूर्ण, नियोजनबद्ध आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तलाव संवर्धनाच्या कामांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये तसेच नागरिकांना त्याचा दीर्घकालीन लाभ मिळावा, यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोराडी तलावाच्या पुनरुज्जीवनामुळे परिसरातील जलसाठा वाढण्यास, भूजल पातळी सुधारण्यास आणि पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




