नागपूर: महालक्ष्मी जगदंबा मंदिर कोराडी येथे आजपासून नवरात्राची स्थापना झाली. सकाळपासून मंत्रोपचाराने देवीची पूजा करण्यात येत आहे. आजपासून देवीसमोर एकच अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित राहणार असून ती ज्योत सायंकाळी प्रज्वलित करण्यात आली. मंदिराचे विश्वस्त आणि मार्गदर्शक ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ही मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात आली. याप्रसंगी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अॅड. मुकेश शर्मा व सर्व विश्वस्त उपस्थित होते.
आई जगदंबेच्या मूर्तीसमोर ही अखंड ज्योत वर्षभर तेवत राहणार आहे. 23 किलो तेल राहील अशी एक मोठी तांब्याची डेग तयार करण्यात आली असून त्यातील तेलाने ही ज्योत 24 तास तेवत राहणार आहे.
आज नवरात्राच्या पहिल्याच दिवशीपासून कोराडी मंदिराचा परिसर गजबजला आहे. भाविकांची गर्दी या परिसरात झाली असून दर्शनासाठी महिला-पुरुष भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. परिसरातील सर्व व्यवस्था सुचारू रुपाने सज्ज आहेत. चोख पोलिस बंदोबस्त असून पार्किंगची व्यवस्था अत्यंत शिस्तबध्द असल्यामुळे मंदिराच्या परिसरात वाहनांची कोणतीही गर्दी नसल्यामुळे भक्तांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही. तसेच सर्व व्यवस्थांवर मंदिर संस्थानच्या विश्वस्तांचे लक्ष असून विश्वस्त जातीने सर्व व्यवस्था पाहात आहेत.

