Published On : Tue, Apr 17th, 2018

प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना निधीअभावी बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे सदाभाऊ खोत यांचे निर्देश

मुंबई : उन्हाळ्यामध्ये गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी. कोणत्याही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना निधीअभावी बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिले.

बुलढाणा जिल्ह्यातील रोहितखेड, देऊळघाट तसेच तिवान प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांचा आढावा श्री. खोत यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्य अभियंता सी. आर. गजभिये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे (मजिप्रा) मुख्य अभियंता एस. एस. चारभळ, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, श्वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते.

जनतेचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची असून त्याप्रमाणे सकारात्मक राहून काम करावे, असे सांगून श्री. खोत म्हणाले, या रखडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कोणत्याही परिस्थितीत चालू करावयाच्या आहेत. या योजनांचे उर्वरित काम होण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व वित्त विभागाकडून निधीची तरतूद करण्यात यावी. वित्त विभागातील त्रुटींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषिमंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांना बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल, असेही श्री. खोत म्हणाले.