Published On : Fri, Aug 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

एका विद्यार्थिनीची हाक ठरली निर्णायक; नागपूर जिल्ह्यातील खेतापूरच्या मुलांसाठी अखेर बससेवेची सोय

Advertisement

नागपूर: शिक्षणासाठी रोज सात किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या खेतापूरच्या मुलींच्या अडचणीला अखेर वाट मिळाली. इयत्ता नववीत शिकणाऱ्या टीना वैकुंठे हिने सामाजिक माध्यमातून मांडलेल्या प्रश्नाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आणि अवघ्या काही काळातच खेतापूर ते नागपूर एसटी बससेवा सुरू करण्यात आली.

कुही तालुक्यातील खेतापूर हे दुर्गम भागातील छोटेसे गाव. गावात माध्यमिक शाळा नसल्याने विद्यार्थिनींना शिक्षणासाठी डोंगरगाव गाठावे लागते. मात्र नियमित बससेवा नसल्याने शाळेत जाणे-येणे हा त्यांच्यासाठी रोजचा संघर्ष बनला होता. वेळेवर वाहन मिळेल की नाही, याची चिंता विद्यार्थिनींना सतावत होती.

टीना वैकुंठे हिने ही समस्या सामाजिक माध्यमातून मांडली. तिची ही हाक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी परिस्थिती केवळ कागदावर समजून न घेता थेट खेतापूर गाठले. टीना आणि गावातील इतर विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

विद्यार्थिनींची समस्या समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. त्यानंतर खेतापूर ते नागपूर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, टीना आणि तिच्या मैत्रिणींच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.

Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीत गावातील इतर प्रश्नांवरही चर्चा झाली. खेतापूर ते डोंगरगाव रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन सप्टेंबरपासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. हे काम अमृतकाल योजनेंतर्गत समाविष्ट करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

खेतापूरला नागपूर महानगरपालिकेची बससेवाही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय गोपाळ समाजाच्या झुडपी जंगल जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न न्यायालयाच्या निर्णयानुसार नियमबद्ध करण्याबाबत तसेच पाळीव जनावरांवरील वाघांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी वन विभागामार्फत उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.

एका विद्यार्थिनीने मांडलेला प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घेतला आणि त्यातून संपूर्ण गावातील मुलींच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला. टीना वैकुंठेची छोटीशी हाक अनेक मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करणारी ठरली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.