Published On : Mon, Jun 17th, 2019

खरबी बहादुरा गोन्हीसिम नगर परिषद करण्याची नागरिकांची मागणी पालकमंत्री बावनकुळे यांचा खरबीत जनसंवाद नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी प्रचंड गर्दी

खरबी बहादुरा आणि गोन्हीसिम या तीनही भागासाठी शासनाने कोट्यवधीचा निधी दिला असून ग्रीन बेल्टमध्ये असलेला हा भाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनामुळे रहिवाशी क्षेत्रात बदल करणे शक्य झाले आहे. खरबी बहादुरा आणि गोन्हीसिम या तीनही गावांची मिळून एक नगर परिषद करण्याची नागरिकांची मागणी लक्षात आपण त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.
खरबी येथील चामट सभागृहात नागरिकांशी थेट संवाद साधता यावा म्हणून जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भागातील नागरिकांनी आपल्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. आलेल्या सर्व नागरिकांचे लेखी निवेदने स्वीकारून ती संबंधित शासकीय यंत्रणेकडे पाठविण्यात येणार आहेत. यात जे नवीन कामाचे अर्ज असतील त्या कामाचे प्रस्ताव तयार शासनाकडे पाठविण्यात येतील, असे याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

या जनसंवाद कार्यक्रमाला पंस. नागपूरचे माजी सभापती अजय बोढारे, जि.प. सदस्य शुभांगी गायधने, सरपंच रामचंद्र वंजारी, नरेश भोयर, भोला कुरटकर, नरेंद्र नांदुरकर, जनसंवाद कार्यक्रमाचे समन्वयक आशिष मोरे उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शासनाच्या विविध विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत या भागात झालेल्या कामांची माहिती जनतेला दिली. तसेच कोणती विकास झाली आणि अपूर्ण आहेत, याची माहितीही जनतेसमोर ठेवली. यात पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य विभाग, कर्जमाफी, कृषी विभाग, महावितरण, महाऊर्जा अशा विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांनी राबविलेल्या प्रकल्पांची माहिती यावेळी सादर केली.

या जनसंवाद कार्यक्रमाला आलेल्या सर्व नागरिकांची अर्ज स्वीकारण्यात आले. अगदी शेवटच्या अर्जावरही कारवाई करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी याप्रसंगी जनतेला दिले.