Published On : Fri, Nov 22nd, 2019

‘खाडिलकर यांनी ‘नवाकाळ’ जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ केले’: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Advertisement

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि नवाकाळचे माजी संपादक नीलकंठ खाडिलकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

‘अग्रलेखांचे बादशाह’ हा खिताब सार्थ करणारे नीलकंठ खाडिलकर लढवय्ये पत्रकार होते. थोर परंपरा लाभलेले ‘नवाकाळ’ वृत्तपत्र चालविताना त्यांनी ते श्रमिक, कष्टकरी व जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ बनविले. कामगारांच्या व सर्वसामन्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली तसेच अनेक प्रश्नांचा शासनदरबारी पाठपुरावा केला. देशाशी तसेच राज्याशी निगडीत विविध विषयांवर वाचकांचे प्रबोधन करतांना त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रप्रेम व संस्कृतीप्रेमाची भावना जागविली. नीलकंठ खाडिलकर यांचे महान कार्य पत्रकार व समाजसेवकांना नेहमी प्रेरणा देत राहील.

त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो व त्यांच्या सर्व आप्त स्वकीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी नवाकाळच्या संपादक जयश्री पांडे-खाडिलकर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.