Published On : Thu, Jan 2nd, 2020

खादी बाजार प्रदर्शनीला नागपुरकरांचा प्रतिसाद

Advertisement

नागपूर: देशाच्या स्वदेशी रोजगार निर्मितीत महत्त्वपूर्ण भर घालणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील खादी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील झाशी राणी चौकात असलेल्या विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात मागील २७ डिसेंबरपासून ‘खादी प्रदर्शनीचे’ आयोजन करण्यात आले आहे. त्याला नागपुरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या औचित्यावर आयोगातर्फे गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत विभागीय निदेशक आणि प्रदर्शनीचे संयोजक डॉ. सी.जी. कापसे यांनी खादी आणि त्यासंबंधित रोजगाराचा आढावा सादर केला.

यामध्ये कापसे म्हणाले, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने यंदा खादी प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. यामध्ये खादीचे शर्ट, पॅन्टपीस, रेडिमेड शर्ट, खादी कुर्ता आणि महिलांचे परिधान उपलब्ध आहेत. याच्या खरेदीला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रमेश गोखले म्हणाले, वैदर्भीय क्षेत्रातील ४० ते ५० हजार महिला खादी आणि ग्रामोद्योगशी जुळलेल्या आहेत. यातील ५-५ महिलांचा गट शाळा-महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना खादी खरेदी करण्याची प्रेरणा देतात. या माध्यमातून खरेदीदारांना १० टक्के सवलत दिली जाते. खादी आणि पोलीस गणवेशाचे जवळचे नाते आहे. पोलिस विभागाला खादी खरेदीस प्रेरित करण्यासाठी त्यांना १० टक्के सवलत दिली जात आहे.

प्रदर्शनीत वेगवेगळ्या उत्पादनांचे ४५ स्टॉल्स लागलेले आहेत. खादीच्या कपड्यांसोबतच आयुर्वेदीक उत्पादने, चपला, कुटीर उद्योग साहित्य आणि इतर उत्पादने वाजवी दरास विक्रीस उपलब्ध आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना खादीशी जोडणे हा या प्रदर्शनीचा मुख्य हेतू आहे. खादीची विक्री वाढल्यास दुर्गम भागातील खेडे, आदिवासी तांडे येथील बेरोजगार, कामगार आणि विणकरांना घरबसल्या रोजगार मिळेल. मुख्य म्हणजे, ग्रामीण भागातील महिला वर्गालाही ग्रामोद्योग आणि सूतकताईतून रोजगाराच्या वाटा मिळतील, असे मत अजय चव्हाण यांनी मांडले. पत्रपरिषदेत संस्थांध्यक्ष रमेश गोखले, खादी आणि ग्रामोद्योग विभागाचे सहायक निदेशक अजय चव्हाण, चारुदत्त बोखारे उपस्थित होते.