Published On : Fri, May 31st, 2019

नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा : राम जोशी

नैसर्गिक आपत्ती पूर्व तयारी आढावा बैठक

नागपूर: नैसर्गिक आपत्ती अचानकपणे आली तर त्याला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. होणाऱ्या नुकसानीची व्याप्ती कमी व्हावी यासाठी सुरू असलेली कामे तातडीने आटोपती घ्यावी. जीवितहानी होणार नाही आणि नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पोहचविता येईल, यादृष्टीने तत्पर राहावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात शुक्रवारी (ता. ३१) नैसर्गिक आपत्ती पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, सहायक आयुक्त महेश मोरोणे, प्रकाश वराडे, राजू भिवगडे, गणेश राठोड, हरिश राऊत, स्मिता काळे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, अमीन अख्तर, मोती कुकरेजा, राजेश राहाटे, गिरीश वासनिक, अविनाश बाराहाते, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.

सदर बैठकीत पावसाळापूर्व नियोजनाअंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा झोननिहाय आढावा घेण्यात आला. सर्व झोन कार्यालयात १ जूनपासून आपातकालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती झोन सहायक आयुक्तांनी दिली. मनपा मुख्यालयातही नियंत्रण कक्ष राहणार असून आपातकालीन परिस्थितीत नागरिक या कक्षाशी संपर्क साधू शकतील, अशी माहिती यावेळी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी नदी स्व्छता अभियान, नाले सफाईचा आढावा घेतला.

नागपूर शहरातील इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्यास काय केले जाईल, शहरातील मेन होल वरील झाकणे, नागपूर शहरातील जीर्ण घरे, किती जीर्ण घरांना नोटीस बजावण्यात आली आहे, किती जीर्ण घरे पाडण्यात आली आहेत, झोन स्तरावर पाणी उपसण्यासाठी असलेले पंप सुस्थितीत आहे अथवा नाही, आपातकालीन परिस्थितीत नागरिकांना हलविण्याची गरज पडली तर त्यांची ज्या शाळांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे त्या शाळांची यादी, तलावाचे पाणी नियंत्रण रेषेच्या वर गेल्यानंतर पाणी सोडण्यापूर्वी घ्यावायची खबरदारी, शहरातील मार्गावरील असलेली धोकादायक झाडे तोडण्यासंबंधात सुरू असलेली कार्यवाही आदींबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली.

झाडांसंदर्भात विद्युत विभागाशी समन्वय ठेवण्यात यावा. नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात यावे, धोकादायक इमारती पाडण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात यावी, असे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.