नदी स्वच्छतेच्या कामाची गती वाढवून नियमित सफाई करा : महापौर नंदा जिचकार
नदी स्वच्छता अभियानाचे निरीक्षण
नागपूर: शहरात सर्वत्र नदी स्वच्छता अभियान सुरू आहे. मात्र वस्त्यांमधून वाहणा-या नद्यांमध्ये कचरा टाकण्यात येत असल्याने तो कचरा पूलाखाली अडकतो त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो व परिसरात दुर्गंधी पसरते. शहरात अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देत पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणतिही अडचण निर्माण होउ नये यासाठी नदी स्वच्छतेच्या कामाची गती वाढवा व नियमित सफाई करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
शहरात सुरू असलेल्या नदी स्वच्छता अभियानांतर्गत महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी (ता.३१) नाग नदीच्या स्वच्छतेचे निरीक्षण केले. यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका कांता रारोकर, मनिषा अतकरे, नगरसेवक राजकुमार साहु, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, नदी स्वच्छता अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, कार्यकारी अभियंता अनिल कडू, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे, उपअभियंता सी.आर. गभणे, उपअभियंता अजय डहाके, कनिष्ठ अभियंता सर्वश्री नितीन झाडे, गजानन वराडे, जगदीश बावनकुळे, जलप्रदाय डेलिगेट्स प्रवीण आगरकर, लकडगंज झोनचे विभागीय अधिकारी वामन काईलकर, गांधीबाग झोनचे झोनल अधिकारी सुरेश खरे, आरोग्य विभागाचे राजेश गायधनी, राजेश नागपुरे आदी उपस्थित होते.
नदी स्वच्छता अभियान निरीक्षण दौऱ्यामध्ये महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह इतर पदाधिका-यांनी शहरातून वाहणा-या नाग नदीच्या विविध स्थळाची पाहणी केली. शंकरनगर पूल, सेंट्रल मॉल पूल, विद्यापीठ ग्रंथालयाजवळील पूल, हॉटेल निडोज लगतचा यशवंत स्टेडियम जवळील पूल, धंतोली झोन कार्यालयाजवळील पूल, मोक्षधाम घाटाजवळील पूल, बैद्यनाथ चौकातील पूल, अशोक चौकातील पूल, रेशीमबाग येथील लोकांची शाळा जवळील पूल, जुनी शुक्रवारी, जगनाडे चौक गायत्री नगरातील नदीचे पात्र, के.डी.के. कॉलेज, हिवरी नगर पम्पींग स्टेशन, प्रजापती चौक, पारडी भंडारा रोड, भरतवाडा, नाग व पिवळी नदी संगम, धारगाव रिंग रोड आदी ठिकाणी महापौर नंदा जिचकार यांच्यासह पदाधिका-यांनी निरीक्षण करून अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.
नदीची स्वच्छता करताना पुलाच्या खाली व अनेक ठिकाणी जेसीबी पोहचत नसल्याने त्या ठिकाणचा गाळ काढला जात नाही. त्यामुळे येथे कचरापण अडकला जातो. अशा ठिकाणी लवकरात लवकर मजुरांकडून स्वच्छता करणे, तसेच पुलाच्या जवळ ३० मीटर पर्यंतच्या भागात दर तीन दिवसांनी नियमीत सफाई करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. वस्त्यांमधून वाहणा-या नदीमध्ये अनेक ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याचे निरीक्षणादरम्यान दिसून आले. आपल्या शहरातील नदी स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. नदीत कचरा टाकल्याने पावसाळ्यात त्याचा त्रास आपल्यालाच सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी समजून नदीमध्ये कचरा न टाकण्याचे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले. या विषयाकडे विभागाने जातीने लक्ष देउन नदी काठावरील अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी नदीमध्ये कचरा टाकताना कुणीही आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, असेही निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
लकडगंज झोन परिसरातून वाहणा-या नाग नदीच्या स्वच्छता कार्यामध्ये लकडगंज झोनचे विभागीय अधिकारी वामन काईलकर यांच्याकडून हलगर्जीपणा केला जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले. पावसाळ्यामध्ये नागरिकांना होणा-या त्रासापासून सुटका मिळावी यासाठी मनपातर्फे दरवर्षी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सुविधेबाबत कामचुकारपणा व हलगर्जीपणा बाळगणा-या अधिका-यांबाबत महापौर नंदा जिचकार यांनी कठोर पवित्रा घेत विभागीय अधिकारी वामन काईलकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
नदी स्वच्छतेचे कार्य सर्वत्र सुरू असून याबाबत योग्य देखरेख ठेवून पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर स्वच्छतेचे संपूर्ण कार्य पूर्ण करुन नागरिकांना पावसाळ्यात त्रास होणार नाही याबाबत योग्य कार्यवाही करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी निर्देशित केले.