Published On : Tue, Jul 27th, 2021

कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन लौकरच सुरु होणार

नागपूर: महा मेट्रोच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर वरील कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन लौकरच प्रवाश्यांच्या सेवेत रुजू होणार आहे. येत्या काही दिवसात मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त यांच्या मार्फत या स्टेशनचे निरीक्षण होणार असून त्या नंतर त्यांची मान्यता मिळाल्यावर स्टेशनहून प्रवाशांचे आवागमन सुरू होईल. या स्टेशनच्या निमित्ताने नागपूरकरांना महा मेट्रो तर्फे मोठी भेट मिळणार आहे.

स्टेशन वरून प्रवाश्यांचे येणे-जाणे सुरु झाले कि उत्तर-दक्षिण कॉरिडॉर वरील मेट्रो गाड्या ज्या सध्या सीताबर्डी इंटरचेंज येथे थांबतात त्या आता या स्थानकावर थांबतील. झिरो माईल स्थानक पार करून त्या पुढील कस्तुरचंद पार्क स्टेशनवर मेट्रो ट्रेकचा नियमित थांबा असेल. तसेच खापरी कडे जाण्याकरता याच स्थानकावरून मेट्रोत बसता येईल.

महा मेट्रोने या मेट्रो स्टेशनचे बांधकाम कस्तुरचंद पार्क मैदानाचे हेरिटेज महत्व लक्षात ठेवत केले आहे. या मैदानातील पॅव्हिलियन वरील जाळी प्रमाणेच मेट्रो स्टेशनच्या बाह्य भागात नक्षीकाम केले आहे. स्टेशनच्या बाह्य भागातील कलाकृती हेरिटेज समितीच्या देखरेखीखाली केली आहे. स्टेशनच्या बाह्य भागातील बांधकाम आणि कस्तुरचंद पार्क मैदानातील पॅव्हिलियन एकाच रंगाचे असून यामुळे या दोन्ही वास्तूंमध्ये सामंत जाणवते. स्टेशनच्या बाह्य भागात केलेले जाळीदार काम एकूण ४,००० चौरस मीटर भागात पसरले आहे.

महत्वाचे म्हणजे, हेरिटेज संबंधी बाबींचे महत्व लक्षात ठेवताना, आधुनिक कलेची जाण महा मेट्रोने ठेवली असून म्हणूनच या स्थानकावर नवीन आणि ऐतिहासिक विषयांचा संगम बघायला मिळतो. कस्तुरचंद पार्क मेट्रो स्थानकावर प्रवाशांकरता सर्व आधुनिक सोइ आहेत.

स्टेशनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन लिफ्ट ची स्थापना केली असून या माध्यमाने रस्त्यावरून स्टेशनच्या कोनकोर्स भागात जाता येते. कोनकोर्स पातळीवरून प्लॅटफॉर्म पर्यंत जाण्या करता तश्याच प्रकारे दोन लिफ्ट आहेत. प्रत्येक लिफ्टची क्षमता १३ प्रवाश्यांची आहे.

लिफ्ट शिवाय, रस्त्यावरून कोनकोर्स भागात तसेच कोनकोर्स भागातुन प्लॅटफॉर्म पर्यंत जाण्याकरता डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी दोन एस्केलेटरची सोया असून या माध्यमाने खालच्या मजल्यावरून सरळ प्लॅटफॉर्म पर्यंत जाण्याची सोया आहे. तसेच खालच्या मार्गाने कोनकोर्स पर्यंत जाण्याकरता दोन तर कोनकोर्स येथून प्लॅटफॉर्मवर जाण्याकरता चार जिने देखील आहेत.

कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनचा एकूण बिल्ट अप परिसर ५,४८६.७४ चौरस मीटर आहे. यात कोनकोर्स (२,४७३ चौरस मीटर), प्लॅटफॉर्म (२,३६८.७४ चौरस मीटर) , डाव्या बाजूने प्रवेश आणि गमन (४०५ चौरस मीटर) आणि उजव्या बाजूने प्रवेश आणि गमन (२४० चौरस मीटर) चा समावेश आहे.

कस्तुरचंद पार्क मेट्रो स्थानक पर्यावरण पूरक आहे. या स्टेशनवर ५ किलो लिटर क्षमतेचे बायो-डायजेस्टर बसवले आहे. कालांतराने स्टेशनच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल देखील बसवले जातील जेणे करून या माध्यमाने निर्मित होणाऱ्या ऊर्जेचा वापर करता येईल.