Published On : Thu, Oct 26th, 2017

कस्तुरचंद डागा 100 वी पुण्यतिथी कार्यक्रम कस्तुरचंद पार्कवर

Advertisement

नागपूर: सर कस्तुरचंद डागा यांची १६ डिसेंबर २०१७ रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्याप्रीत्यर्थ कस्तुरचंद पार्क येथे कार्यक्रमाचे आयोजनासाठी नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने मंजुरी दिली आहे. बुधवारी (ता. 25 ऑक्टोबर) मनपा मुख्यालयात हेरिटेज संवर्धन समिती सभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती होते. सभेत हेरिटेज संवर्धन समितीचे सदस्य अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, स्ट्रक्चरल अभियंता पी.एस.पाटणकर, रातुम नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या डॉ. शुभा जोहरी, वास्तुविशारद, अर्बन डिझायनर अशोक मोखा, हेरिटेज समीतीच्या सदस्य सचिव तथा नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थुल, धरमपेठ झोनचे सहायक आय़ुक्त महेश मोरोणे, नगररचनाकार प्रविण सोनारे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनविस यांची उपस्थिती होती.

बुधवारी आयोजित हेरीटेज संवर्धन समीतीच्या सभेत एकूण 14 विषय सादर करण्यात आले. त्यापैकी व्यावसायिक हेतू असलेल्या 6 कार्यक्रमांना हेरीटेज समितीने परवानगी नाकारली. उर्वरित 6 विषयांना परवानगी देण्यात आली. तसेच मागिल सभेतील 2 विषयांवर सभेत चर्चा झाली. कार्यक्रमांसाठी अर्ज करणा-यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून अटी-शर्तीची पूर्तता करुन रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. समीतीने परवानगी दिलेल्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय मॉयनारिटी मोर्चा तर्फे आयोजित एकदिवसीय प्रबोधन कार्यक्रम, बहुजन समाज पार्टीतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळावा, गायत्री परीवार ट्रस्ट तर्फे आयोजित विराट युवा समागम, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट ऑफ इंडिजिनस पिपल्सतर्फे आयोजित राष्ट्रीय महापुरुष क्रांतीकारी शहीद बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम, शहराच्या विकासात मोठे योगदान असलेल्या सर कस्तुरचंद डागा यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली.

कस्तुरचंद डागा यांची १६ डिसेंबर २०१७ रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्याप्रीत्यर्थ एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन नागपूर महानगरपालिकेतर्फे कस्तुरचंद पार्क येथे करण्यात येणार आहे. यासोबतच सिव्हील लाईन्स येथील विधान भवन परिसरात जुन्या हेरिटेज इमारतीला लागून प्रस्तावित दोन मजल्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्याकरिता हेरिटेज संवर्धन समितीने मंजुरी दिली आहे.