नागपूर: शहराच्या कपिल नगर हत्याकांडामध्ये मोठा खुलासा झाला आहे. ही हत्या सुपारी देऊन घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. हत्येप्रकरणी ४ अल्पवयीनांसह ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंकुश कडू (वय ५४), हे गुरु तेगबहादूर नगर, नारी रोड येथील रहिवासी होते. त्यांची हत्या शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास कपिल नगरमधील म्हाडा चौक परिसरात करण्यात आली.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं की एक आरोपी कडू यांच्या गळ्याला धरून ठेवतो आणि बाकी तिघे आरोपी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार करत आहेत.
ही हत्या प्रॉपर्टी विवादातून झाल्याचा संशय आहे. एका प्रॉपर्टी डीलरने दुसऱ्या डीलरवर राग ठेवून सुपारी दिल्याची चर्चा आहे. यामध्ये जीतू शहा आणि विलास नंदनवार यांची नावे पुढे आली आहेत.
विशेष म्हणजे या हत्येमध्ये सामील असलेल्या एका अल्पवयीनावर पूर्वीही गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याने कलमना परिसरात सलमान नावाच्या युवकाची हत्या केली होती आणि बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं होतं, पण लवकरच तो बाहेर आला.