नागपूर : कपिलनगर परिसरात कूलरमधून वाहणाऱ्या ओव्हरफ्लो पाण्यावरून सुरू झालेला शेजाऱ्यांतील किरकोळ वाद हिंसक वळणावर पोहोचला. शिवीगाळ, मारहाण आणि त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने एक युवक जखमी झाला. या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. तर फरार असलेल्या आणखी दोन आरोपींना कपिलनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाच्या कूलरचे ओव्हरफ्लो पाणी तळमजल्यावर राहणाऱ्या हसन उर्फ बड्डू जर्मन खान यांच्या अंगणात पडत होते. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला.
या वादादरम्यान हसन उर्फ बड्डू जर्मन खान आणि त्याचा साथीदार क्षितिज उर्फ साहिल कुशवाह यांनी फिर्यादी, त्यांची आई आणि पुतण्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याचा जाब विचारताच वाद चिघळला आणि आरोपींनी मारहाण करत धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र दोन आरोपी घटनेनंतर फरार झाले होते. त्यांचा शोध घेत अखेर पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




