Published On : Sun, Aug 11th, 2019

कामठी उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीनीकरणाचे काम लवकर पूर्ण करा : पालकमंत्री बावनकुळे रुग्णालयाची पाहणी आणि आढावा बैठक

Advertisement

नागपूर: कामठी उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीनीकरणाचे काम लवकर पूर्ण करून रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत येत्या दिवाळीपर्यंत इमारत लोकार्पण करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित एका बैठकीत दिले.
शनिवारी ही बैठक रुग्णालयात घेण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष शाहाजहा शफाअतग अन्सारी, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे, आरोग्य उपसंचालक डॉ. जयस्वाल, सिव्हिल सर्जन पातुरकर, कामठी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. श्रध्दा भाजीपाले आदी उपस्थित होते. या रुग्णालयात 50 बेडची व्यवस्था होती. आता ती 100 पर्यंत नेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. 50 बेडसाठी 19 पदे होती. 100 बेडसाठी मात्र 94 पदांची भरती कंत्राटदारी पध्दतीने लवकर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. कर्मचार्‍यांचे क्वार्टर्स नवीन बनवा आणि पार्किंगची व्यवस्था करा. जुन्या इमारतीवर एक मजला अधिक बांधून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही दिले.

याच बैठकीत रुग्णालयाच्या परिसरात हायमास्ट लाईट आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचे निर्देशही देण्यात आले. मशीन आणि अन्य सुविधांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला. निधीची आवश्यकता भासली तर भविष्यात अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. रुग्णालय प्रशासनातर्फे स्थायी वैद्यकीय अधीक्षक, नवीन अ‍ॅम्बुलन्स व परिसरात पोलिस चौकीची मागणी करण्यात आली. यावर पालकमंत्र्यांनी खनिज प्रतिष्ठानकडे या कामाचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या.

कामठी येथील तहसिलमध्ये तीन प्रशासकीय इमारतींवर सोलर सिस्टिम लावण्यात आली असून गेल्या एक वर्षापासून ही सिस्टिम कार्यरत नसल्याचे पालकमंत्र्यांना सांगण्यात आले. या रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना चांगला औषधोपचार मिळावा अशी अपेक्षाही पालकमंत्र्यांनी केली. याप्रसंगी तहसिलदार अशोक हिंगे, डॉ. महेश महाजन, शहर भाजपाध्यक्ष विवेक मंगतानी, मनीष वाजपेयी, महामंत्री लाला खंडेलवार, रवी गोयर, बरिएमचे जिल्हाध्यक्ष अजय कदम, सुभाष मंगतानी व अन्य अधिकारी उपस्थित होते.